दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ 23 जुलैला 'महाराष्ट्र बंद'; प्रकाश आंबेडकरांची घोषणा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 July 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ 23 जुलैला 'महाराष्ट्र बंद'; प्रकाश आंबेडकरांची घोषणा


मुंबई | जेपीएन न्यूज - दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्ज आणि कथित दडपशाहीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा करत सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी संघटना आणि नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि पोलिसांची कारवाई निषेधार्ह आहे. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचे संरक्षण झाले पाहिजे. या घटनेच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र बंद आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काय आहे दिल्लीतील आंदोलनाची पार्श्वभूमी? - 
अलीकडे विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधील कथित पेपर लीक, परीक्षा रद्द होणे, निकालातील विलंब आणि भरती प्रक्रियेतील अनियमितता या मुद्द्यांवर देशभरातील विद्यार्थी संतप्त आहेत. या मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. आंदोलक विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, पेपर लीक प्रकरणांची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि वेळेत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली.

दरम्यान, आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना हटविण्याचा प्रयत्न केल्याने धक्काबुक्की व लाठीचार्ज झाल्याचे वृत्त समोर आले. या कारवाईवर विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना आणि विरोधी पक्षांनी टीका केली असून विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे.

याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. या बंदला इतर राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनांचा किती प्रतिसाद मिळतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS