
मुंबई | जेपीएन न्यूज - मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या बेस्ट (BEST) उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचा इशारा दिला आहे. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत 15 ऑगस्टपर्यंत प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईतील बससेवेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कृती समितीने 21 जून रोजी झालेल्या वेतन करारावर आक्षेप नोंदवला असून, कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांशी व्यापक चर्चा न करता हा करार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या करारामुळे अनेक महत्त्वाच्या आणि प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा दावा समितीने केला आहे. त्यामुळे वेतन कराराचा फेरविचार करून सर्व संबंधित संघटनांशी पुन्हा चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
समितीने शासनासमोर सुधारित वेतनश्रेणी लागू करणे, महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सेवा-शर्ती लागू करणे, आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्ट उपक्रमाला शासनाकडून आर्थिक मदत देणे, प्रलंबित वेतन कराराची तातडीने अंमलबजावणी करणे तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना 'समान काम, समान दाम' या तत्त्वानुसार वेतन देण्याच्या प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.
कृती समितीने पत्राद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. 15 ऑगस्टपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशाराही समितीने दिला आहे.
दरम्यान, संप झाल्यास लाखो मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार, बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटना यांच्यातील चर्चेतून तोडगा निघतो का, याकडे कर्मचारी आणि प्रवासी दोघांचेही लक्ष लागले आहे.


No comments:
Post a Comment