मुंबईतील प्रसुतीगृहांचे 'माता व बाल रुग्णालयां'मध्ये रूपांतर करा - प्रिती सातम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 July 2026

मुंबईतील प्रसुतीगृहांचे 'माता व बाल रुग्णालयां'मध्ये रूपांतर करा - प्रिती सातम


मुंबई | जेपीएन न्यूज - मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील प्रसुतीगृहांमध्ये केवळ प्रसूतीची सुविधा न ठेवता नवजात व लहान बालकांवरील उपचार, बालरोगतज्ज्ञ सेवा, नवजात अतिदक्षता विभाग (NICU), लसीकरण आणि माता-बाल आरोग्याच्या सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देत त्यांचे 'माता व बाल रुग्णालयां'मध्ये रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी महापालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे केली.

या सूचनेवर चर्चा झाल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी प्रशासनाला या प्रस्तावाबाबत सविस्तर अभिप्राय पुढील सभेत सादर करण्याचे निर्देश दिले.

प्रिती सातम यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेच्या २८ प्रसुतीगृहांमध्ये गर्भवती महिलांना प्रसूतीची सुविधा दिली जाते. मात्र, प्रसूतीनंतर नवजात बालकांना जन्मजात आजार, जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारे विकार किंवा इतर आरोग्य समस्या उद्भवल्यास त्यांच्यावर उपचाराची सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध नसते. त्यामुळे बालकांना इतर महापालिका किंवा खासगी रुग्णालयात हलवावे लागते. परिणामी उपचारास विलंब होऊन पालकांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो.

त्यामुळे प्रत्येक प्रसुतीगृहात बालरोग विभाग, नवजात अतिदक्षता विभाग, तज्ज्ञ डॉक्टर, आवश्यक वैद्यकीय उपकरणे, लसीकरण, पोषण सल्ला आणि माता-बाल आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून 'माता व बाल रुग्णालय' ही संकल्पना राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

महापालिकेच्या सर्व प्रसुतीगृहांसोबतच बाल चिकित्सा केंद्रेही एकाच ठिकाणी विकसित करून त्यांची दर्जोन्नती करण्यात यावी. यामुळे गर्भवती महिला, नवजात बालके आणि लहान मुलांना आवश्यक सर्व उपचार एकाच छताखाली मिळतील तसेच मातांना बालकांच्या उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांत धावपळ करावी लागणार नाही, असेही सातम यांनी स्पष्ट केले.

या ठरावाच्या सूचनेवरील चर्चेत डॉ. शिल्पा सांगारे, जागृती पाटील, स्वप्ना म्हात्रे, विशाखा राऊत, शीतल गंभीर, किशोरी पेडणेकर, हरीश भांदिर्गे तसेच सभागृह नेते गणेश खणकर यांनी सहभाग घेत या मागणीला पाठिंबा दर्शविला आणि काही सूचना मांडल्या. त्यानंतर महापौर रितू तावडे यांनी प्रशासनाला सर्व सूचनांचा विचार करून पुढील बैठकीत सविस्तर अभिप्राय सादर करण्याचे निर्देश दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS