पावसाळ्यात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम ठेवा - प्राजक्ता वर्मा-लवंगारे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 July 2026

पावसाळ्यात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम ठेवा - प्राजक्ता वर्मा-लवंगारे

मुंबई | जेपीएन न्यूज - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेने रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आणि गॅस्ट्रोसारख्या पावसाळी आजारांवर नियंत्रणासाठी उच्च जोखमीच्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिले.

जोगेश्वरी (पूर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयाला भेट देऊन त्यांनी आरोग्य सेवांचा आढावा घेतला. सर्व रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविणे, बांधकामस्थळे व झोपडपट्टी भागांची नियमित तपासणी करणे आणि साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आरोग्य सुविधांच्या दुरुस्तीची कामे 'मिशन मोड' मध्ये पूर्ण करावीत, तसेच सहायक वैद्यकीय अधिकारी, कीटकनाशक अधिकारी आदी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (HMIS), स्वच्छता, आरोग्य केंद्रांची देखभाल आणि नागरिकांकडून मिळणाऱ्या अभिप्रायाचा नियमित आढावा घेण्यावरही त्यांनी भर दिला.

याशिवाय, नागरिक सुविधा केंद्रे (CFC) अधिक सक्षम करून आरोग्य सेवांशी संबंधित अर्ज प्रक्रिया आणि परवाना प्रक्रिया अधिकाधिक ऑनलाइन व नागरिकाभिमुख करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दफनभूमींची स्वच्छता, देखभाल आणि आवश्यक सुविधांबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.

यावेळी उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, उप आयुक्त (परिमंडळ-४) भाग्यश्री कापसे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS