
मुंबई | जेपीएन न्यूज - मुंबईतील झाडे पडण्याच्या घटनांवरून महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)ने जोरदार टीका केली आहे. आयुक्त आणि महापौर यांच्यातील विसंवादामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी केला.
मुंबईत २०२१ ते २०२६ या कालावधीत झाडे पडण्याच्या घटनांबाबत आयुक्त आणि महापौर वेगवेगळी कारणे सांगत असून, या परस्परविरोधी भूमिकेमुळे प्रशासनातील समन्वयाचा अभाव स्पष्ट होत असल्याचे मातेले म्हणाले.
रस्त्यांच्या काँक्रीटीकरणामुळे झाडांच्या मुळांना आवश्यक माती व पाणी मिळत नसल्याने झाडे कमकुवत होत असल्याचा आरोप त्यांनी केला. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार झाडांच्या बुंध्याभोवती मोकळी जागा ठेवणे आवश्यक असतानाही अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावाही त्यांनी केला.
पावसाळ्यापूर्वी झाडांच्या छाटणीवर कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडत असल्याने या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे मातेले यांनी सांगितले.
ज्या कंत्राटदारांनी नियमांचे उल्लंघन करून झाडांच्या बुंध्यापर्यंत काँक्रीटीकरण केले, त्यांच्यावर कठोर कारवाई करून सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)च्या वतीने करण्यात आली आहे. तसेच प्रशासनाने अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून मुंबईकरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही पक्षाने दिला.


No comments:
Post a Comment