
मुंबई | जेपीएन न्यूज -
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्य सभागृहातील आसन व्यवस्थेबाबत गेल्या तीन वर्षांत नागरिक किंवा सदस्यांकडून एकही तक्रार प्राप्त झालेली नसल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. तसेच, मागील पाच वर्षांत सभागृहातील आसनव्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत महापालिकेकडे सभागृहातील आसनव्यवस्थेबाबत माहिती मागविली होती. कार्यकारी अभियंता (मुख्यालय) कार्यालयाने दिलेल्या उत्तरानुसार, महापालिका सभागृहात एकूण 237 आसने असून त्यापैकी 227 नगरसेवकांसाठी आणि 10 स्वीकृत नगरसेवकांसाठी राखीव आहेत. ही आसनरचना अनेक वर्षांपासून कायम असून गेल्या पाच वर्षांत त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
गलगली यांनी नगरसेवक, अधिकारी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, प्रेक्षक आणि इतरांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्थेचा तपशील, विद्यमान व्यवस्था कधीपासून लागू आहे तसेच त्यात झालेले बदल याबाबत माहिती मागितली होती. मात्र, काही मुद्दे संबंधित विभागाच्या कार्यकक्षेत येत नसल्याने ती माहिती उपलब्ध नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. तसेच, सभागृहातील आसनव्यवस्थेबाबत गेल्या तीन वर्षांत नागरिक किंवा सदस्यांकडून एकही तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे महापालिकेने उत्तरात नमूद केले आहे.
याबाबत अनिल गलगली यांनी सांगितले की, महापालिका सभागृह हे शहरातील सर्वोच्च लोकशाही निर्णयप्रक्रियेचे केंद्र असल्याने त्याची क्षमता, आसनव्यवस्था आणि त्यासंदर्भातील माहिती नागरिकांसाठी पारदर्शकपणे उपलब्ध असणे आवश्यक आहे. माहिती अधिकारामुळे अशा बाबींमध्ये पारदर्शकता वाढण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment