साकीनाका मॅनहोल दुर्घटना, शिवसेनेकडून आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 July 2026

साकीनाका मॅनहोल दुर्घटना, शिवसेनेकडून आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी


मुंबई | जेपीएन न्यूज डेस्क, दि. २ जुलै : साकीनाका येथील खैरानी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय अस्लम शेख यांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेच्या कारभारावर सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. उपमहापौर संजय घाडी, शिवसेनेचे गटनेते अमेय घोले आणि राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

उपमहापौर संजय घाडी यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत, "मॅनहोलवरील संरक्षण जाळ्यांचे कंत्राट संपले असून नव्याने जाळ्या बसविण्याबाबत आपण पत्राद्वारे पालिका आयुक्तांकडे मागणी केली होती. मात्र, आयुक्तांनी या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले. आता साकीनाक्यात एका व्यक्तीचा जीव गेल्यानंतर त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आयुक्तांनी राजीनामा द्यावा," असे म्हटले.

दरम्यान, उपमहापौर संजय घाडी आणि प्रभाग समिती अध्यक्ष विजेंद्र शिंदे यांच्यासह शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली. यावेळी बोलताना अमेय घोले यांनी, "निष्पाप अस्लम शेख यांना जीव गमवावा लागणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या निष्काळजीपणासाठी जबाबदार 'एल' विभागाचे सहाय्यक आयुक्त, संबंधित कंत्राटदार आणि इतर दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे," अशी मागणी केली.

राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनीही सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया देताना, "आणखी एका मुंबईकराचा जीव गेला. ही दुर्घटना नसून निष्काळजीपणा, अपयशी यंत्रणा आणि जबाबदारीच्या अभावाचे परिणाम आहेत. खुले मॅनहोल हा अपघात नसून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा पुरावा आहे. मुंबईकरांना उत्तर हवे आहे," असे म्हटले. तसेच, मुंबई उच्च न्यायालयानेही खुले मॅनहोल आणि असुरक्षित रस्त्यांच्या प्रश्नावर महापालिकेला अनेकदा फटकारले असतानाही अशा घटना सुरूच असल्याची आठवण त्यांनी करून दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages