साकीनाक्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 July 2026

साकीनाक्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

फाईल फोटो

मुंबई | जेपीएन न्यूज डेस्क, दि. २ जुलै : साकीनाका परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या गटारावर जाळी लावण्याचे काम सुरू असताना उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाने सुमारे दोन तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर संबंधित व्यक्तीला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरानी रोड येथे पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या जाळीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. याचदरम्यान अस्लम इसाफ शेख (वय ५५), रा. यादव नगर, साकीनाका हे पायी जात असताना उघड्या मॅनहोलमधून पाण्याच्या गटारात पडले. दुपारी १२.२६ वाजता घटनेची माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. गटारातील वायू बाहेर काढण्यासाठी एक्झॉस्ट ब्लोअरचा वापर करण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान ब्रीदिंग अॅपरेटस (BA Set) परिधान करून गटारात उतरले. रेस्क्यू व्हॅन, ट्रायपॉड आणि दोरीच्या शिडीच्या साहाय्याने अस्लम शेख यांना बाहेर काढण्यात आले.

त्यानंतर त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत (Brought Dead) झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे उघड्या मॅनहोलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

महापौरांच्या उपस्थितीत कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला होता - 
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या महापौरांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या पाहणीदरम्यान एक महापालिका कर्मचारी उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतरही उघड्या मॅनहोलच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. आता साकीनाक्यात ६० वर्षीय नागरिक उघड्या मॅनहोलमध्ये वाहून गेल्याच्या घटनेमुळे महापालिकेच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS