साकीनाका मॅनहोल दुर्घटना : ‘एल’ विभागाच्या सहायक आयुक्तांसह चौघांचे निलंबन; कंत्राटदार ब्लॅकलिस्ट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 July 2026

साकीनाका मॅनहोल दुर्घटना : ‘एल’ विभागाच्या सहायक आयुक्तांसह चौघांचे निलंबन; कंत्राटदार ब्लॅकलिस्ट


मुंबई | जेपीएन न्यूज डेस्क, दि. २ जुलै : साकीनाका येथील खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय अस्लम इसाक शेख यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी ‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्यासह चार अधिकाऱ्यांना चौकशीसापेक्ष निलंबित केले असून, संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महापालिकेच्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी खैरानी रोड येथे मलनिस्सारण विभागाकडून मॅनहोलवर संरक्षण जाळी बसविण्याचे काम सुरू होते. यावेळी कंत्राटदाराकडून आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्याचवेळी मोबाईलवर बोलत पायी जात असलेले अस्लम इसाक शेख (वय ५५) यांचा तोल जाऊन ते उघड्या मॅनहोलमध्ये पडले.

घटनेनंतर मुंबई अग्निशमन दलाने गटारातील वायू बाहेर काढण्यासाठी एक्झॉस्ट ब्लोअरचा वापर करून जवानांना गटारात उतरवले. ट्रायपॉड आणि दोरीच्या शिडीच्या सहाय्याने शेख यांना बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या दुर्घटनेची गंभीर दखल घेत आयुक्तांनी सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर, सहायक/दुय्यम अभियंता दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता अभिजीत चौगुले आणि सहायक अभियंता उत्तम पाटील यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले आहे. तसेच सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कठोर कारवाई करत त्याला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली असून, समितीत उपआयुक्त (सामान्य प्रशासन), उपआयुक्त (परिमंडळ-७) आणि उपआयुक्त (पायाभूत सुविधा) यांचा समावेश आहे. समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, मृत अस्लम शेख यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा महापौर ऋतू तावडे यांनी केली आहे.

भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी मॅनहोलवरील कामांदरम्यान चारही बाजूंनी बॅरिकेड्स उभारणे बंधनकारक करण्यात आले असून, पुढील आठ दिवसांत मुंबईतील सर्व मॅनहोलची १०० टक्के तपासणी करून सुरक्षिततेचा अहवाल सादर करण्याचे आदेशही सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages