कुर्ला L वॉर्डचे विभाजन तातडीने करा; काँग्रेस गटनेते अशरफ आझमी यांची आयुक्तांकडे मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 July 2026

कुर्ला L वॉर्डचे विभाजन तातडीने करा; काँग्रेस गटनेते अशरफ आझमी यांची आयुक्तांकडे मागणी


मुंबई | जेपीएन न्यूज डेस्क, दि. ३ जुलै :
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) एल विभागाचे (L ward) दोन स्वतंत्र प्रशासकीय विभागांमध्ये तातडीने विभाजन करण्यात यावे, अशी मागणी मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी (Ashraf Azami) यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.

आझमी यांनी निवेदनात म्हटले आहे की, कुर्ला, साकीनाका, चांदिवलीसह परिसराचा समावेश असलेला एल विभाग हा मुंबईतील सर्वात मोठ्या प्रशासकीय विभागांपैकी एक असून, सुमारे नऊ लाख नागरिक आणि १६ निवडणूक प्रभागांचा कारभार या एकाच विभागाकडून सांभाळला जातो. त्यामुळे प्रभावी प्रशासन आणि नागरिकांना वेळेत सेवा देणे कठीण होत आहे.

साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय अस्लम शेख यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू, पावसाळ्यात वारंवार होणारे पाणी साचणे, अपुरी नालेसफाई, पावसाळ्यापूर्वीच्या कामांतील विलंब आणि नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणातील दिरंगाई या घटनांमुळे एल विभागाचे विभाजन करण्याची गरज अधिक तीव्रतेने समोर आली असल्याचे त्यांनी नमूद केले.

"एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा आणि विस्तीर्ण क्षेत्राचा कारभार एका प्रशासकीय विभागाकडून प्रभावीपणे चालविणे शक्य नाही. एल विभागाचे दोन स्वतंत्र विभाग झाल्यास नागरिकांना अधिक जलद, उत्तरदायी आणि कार्यक्षम नागरी सेवा मिळू शकतील," असे आझमी यांनी म्हटले आहे.

महापालिका प्रशासनाने एल विभागाच्या विभाजनाचा प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages