सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना धमक्या देणे हुकूमशाहीचे लक्षण; वर्षा गायकवाडांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 July 2026

सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना धमक्या देणे हुकूमशाहीचे लक्षण; वर्षा गायकवाडांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल


मुंबई | जेपीएन न्यूज|८ जुलै -
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्य केल्याचा आरोप करत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे महाराष्ट्राची बदनामी नसून, लोकशाहीतील नागरिकांचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवरील सुमारे ७ हजार कोटी रुपयांच्या मिसिंग लिंक प्रकल्पावर अवघ्या दोन महिन्यांत खड्डे पडले आणि वाहतूक बंद करण्याची वेळ आली, ही निकृष्ट दर्जाच्या कामाची साक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकल्पांवर प्रश्न विचारणाऱ्यांना मुख्यमंत्री "भाड्याचे तट्टू" म्हणत असतील, तर ते लोकशाही नव्हे तर हुकूमशाहीचे लक्षण असल्याचे गायकवाड म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांनी "महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही" असे विधान केल्याचा संदर्भ देत त्यांनी विचारले की, निकृष्ट दर्जाची कामे, अपघात, भ्रष्टाचार आणि जनतेच्या पैशांची उधळपट्टी हीच महाराष्ट्राची खरी बदनामी नाही का? जनतेच्या पैशातून उभारलेल्या प्रकल्पांबाबत प्रश्न विचारणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपने विरोधकांची आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सोशल मीडियावर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला. दुसऱ्यांना "भाड्याचे तट्टू" म्हणण्यापूर्वी भाजपने स्वतःच्या प्रचारयंत्रणेचा आढावा घ्यावा, असा टोला त्यांनी लगावला.

सरकारने टीकाकारांना लक्ष्य करण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांची तथ्यांसह उत्तरे द्यावीत, अशी मागणी करत "जे पेरले तेच उगवले", असा उपरोधिक इशाराही वर्षा गायकवाड यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages