भांडुपमध्ये BEST बसचा भीषण अपघात; रिव्हर्स घेताना पादचाऱ्याला चिरडले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 July 2026

भांडुपमध्ये BEST बसचा भीषण अपघात; रिव्हर्स घेताना पादचाऱ्याला चिरडले


मुंबई | जेपीएन न्यूज | ८ जुलै -
भांडुप (पश्चिम) येथील कोकण नगर परिसरात बुधवारी सकाळी BEST बस रिव्हर्स घेत असताना एका ज्येष्ठ पादचाऱ्याला धडक लागून ते जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात दोन दुचाकी आणि एका रिक्षेचेही नुकसान झाले.

BEST प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, A-425/32 मार्गावरील (बस क्रमांक 4047) बस सकाळी साडेआठच्या सुमारास कोकण नगर येथे उजवीकडे वळत असताना वळण व्यवस्थित घेता न आल्याने चालकाने बस रिव्हर्स घेतली. त्यावेळी बसचा मागील भाग रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्याला धडकला. पादचारी बस आणि रस्त्यालगतच्या मोठ्या झाडाच्या कुंडीमध्ये अडकला.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी बस पुढे ढकलून पादचाऱ्याची सुटका केली. मात्र, या गोंधळात बस पुढे सरकून चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने पार्क केलेल्या दोन दुचाकी आणि एका रिक्षेला धडक दिली.

या अपघातात अतुल आनंद पडाळे (वय ६३) हे जखमी झाले असून त्यांच्या दोन्ही मांड्यांना गंभीर मार लागून रक्तस्राव झाला. बस वाहकाने त्यांना तातडीने मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच BEST चे विशेष बस निरीक्षक आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. भांडुप पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS