भांडुपमध्ये गॅस गळतीत तिघे भाजले, मानखुर्दमध्ये स्लॅब कोसळून महिला जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 July 2026

भांडुपमध्ये गॅस गळतीत तिघे भाजले, मानखुर्दमध्ये स्लॅब कोसळून महिला जखमी


मुंबई | जेपीएन न्यूज - मुंबईत रविवारी वेगवेगळ्या भागांत घडलेल्या दोन दुर्घटनांमध्ये तिघेजण भाजले तर एका महिलेस गंभीर दुखापत झाली. भांडुपमधील खिंडीपाडा येथे गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत तीन जण भाजले, तर मानखुर्दमधील मोडकळीस आलेल्या चाळीचा स्लॅब कोसळल्याने एक महिला जखमी झाली. जखमी महिलेने उपचारादरम्यान वैद्यकीय सल्ल्याविरुद्ध (DAMA) रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

गॅस गळतीमुळे आग; तिघे भाजले - 
भांडुप परिसरातील अमन नगर, खिंडीपाडा येथे रविवारी सायंकाळी गॅस उपकरणाची देखभाल सुरू असताना गॅस गळती होऊन आग लागली. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत प्रमिला विश्वकर्मा (५०) या सुमारे ४० टक्के, आराधना विश्वकर्मा (२४) या २० टक्के, तर मोहम्मद (५२) हे सुमारे ३० टक्के भाजले. तिघांवर मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मानखुर्दमध्ये स्लॅब कोसळला - 
शनिवारी सायंकाळी मानखुर्द येथील पीएमजीपी कॉलनी, आंबेडकर नगरमधील श्री सरस्वती चाळ या रिकाम्या व मोडकळीस आलेल्या जी+१ इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कपडे वाळत घालण्यासाठी गेलेल्या सुनीता यादव (२५) या महिलेखालील स्लॅब अचानक कोसळला. त्यामुळे त्या थेट तळमजल्यावर पडून जखमी झाल्या.

त्यांना प्रथम शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी सायन रुग्णालयात हलविण्यात आले. महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, जखमी सुनीता यादव यांनी रविवारी सकाळी DAMA (Discharge Against Medical Advice) घेत वैद्यकीय सल्ल्याविरुद्ध सायन रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला.

दोन्ही घटनांबाबत संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास आणि आवश्यक कार्यवाही सुरू आहे.

— JPN NEWS

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS