
मुंबई JPN NEWS - मुंबईतील आमदारांच्या विधानसभेतील कामगिरीचा लेखाजोखा मांडणाऱ्या प्रजा फाउंडेशनच्या ‘मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड २०२६’मध्ये काँग्रेसने दमदार कामगिरी करत पहिल्या तीनही क्रमांकांवर कब्जा केला आहे. मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल, मालाडचे आमदार अस्लम शेख आणि धारावीच्या आमदार ज्योती गायकवाड यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. मात्र, एकीकडे काँग्रेसच्या आमदारांनी अव्वल कामगिरी केली असताना दुसरीकडे मुंबईतील आमदारांकडून विधानसभेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या आणि गुणवत्ता दोन्ही घटल्याचे धक्कादायक चित्र या अहवालातून समोर आले आहे.
प्रजा फाउंडेशनने हिवाळी अधिवेशन २०२४ ते पावसाळी अधिवेशन २०२५ या कालावधीतील मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले. उपस्थिती, विधानसभेतील सहभाग, विचारलेले प्रश्न, प्रश्नांची गुणवत्ता आदी निकषांच्या आधारे हे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आले आहे.
या क्रमवारीत अमीन पटेल यांनी ८२.८९ गुणांसह प्रथम क्रमांक, अस्लम शेख यांनी ८०.५८ गुणांसह दुसरा, तर ज्योती गायकवाड यांनी ८०.३० गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या तीनही आमदारांचा संबंध काँग्रेसशी आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे सुनील प्रभू आणि मनोज जामसुतकर अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
प्रश्न विचारण्यात मोठी पिछेहाट -
मुंबईतील आमदारांच्या कामगिरीतील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे विधानसभेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची घटलेली संख्या. १२व्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशन २००९ ते पावसाळी अधिवेशन २०१० या कालावधीत मुंबईतील आमदारांनी तब्बल ७,९५५ प्रश्न विचारले होते. १५व्या विधानसभेत हाच आकडा केवळ २,२१३ वर आला आहे. म्हणजेच प्रश्न विचारण्याच्या संख्येत तब्बल ७२ टक्क्यांची घट झाली आहे.
प्रश्नांची गुणवत्ताही घसरल्याचे अहवालातून समोर आले आहे. १२व्या विधानसभेत प्रश्नांच्या गुणवत्तेची सरासरी ५० टक्के होती. १५व्या विधानसभेत ती ३३ टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांच्या प्रश्नांना विधानसभेच्या पटलावर मांडण्यासाठी उपलब्ध असलेल्या घटनात्मक व्यासपीठाचा वापर अपेक्षेइतका प्रभावीपणे होत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
आमदारांच्या सरासरी गुणांतही घसरण -
आमदारांच्या एकत्रित कामगिरीच्या सरासरी गुणांमध्येही मोठी सुधारणा झालेली नाही. १२व्या विधानसभेत आमदारांची सरासरी कामगिरी ६१ गुणांची होती. १४व्या विधानसभेत ती ५४ गुणांवर घसरली, तर १५व्या विधानसभेत किंचित वाढून ५५ गुणांवर पोहोचली आहे.
प्रजा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांच्या मते, नागरिकांचे प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे पोहोचणे हा आमदारांच्या कामगिरीचा मूलभूत निकष आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी सभागृहात प्रश्न मांडणे, चर्चेत सहभागी होणे आणि सरकारच्या उत्तरदायित्वाचा आग्रह धरणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभागृहाचे कामकाजही कमी -
१५व्या विधानसभेच्या पहिल्या वर्षात विधानसभेचे कामकाज केवळ ४० दिवस झाले. याच्या तुलनेत १२व्या विधानसभेत ४७ आणि १३व्या विधानसभेत ५० दिवस कामकाज झाले होते. त्यामुळे कामकाजाचे दिवस कमी होणे आणि त्याचवेळी प्रश्नांची संख्या व गुणवत्ता घसरणे, ही बाब लोकप्रतिनिधींच्या विधिमंडळातील भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहे.
दरम्यान, मुंबईतील आमदारांचे सरासरी वयही वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. १२व्या विधानसभेत मुंबईतील आमदारांचे सरासरी वय ५२ वर्षे होते. १३व्या विधानसभेत ते ५१, १४व्या विधानसभेत ५३, तर १५व्या विधानसभेत ते ५७ वर्षांवर पोहोचले आहे.
एकीकडे काँग्रेसच्या तीन आमदारांनी कामगिरीच्या क्रमवारीत बाजी मारली असताना, दुसरीकडे मुंबईतील सर्व आमदारांच्या एकत्रित कामगिरीतील घसरणीने ‘निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नागरिकांचे प्रश्न विधानसभेत किती ताकदीने मांडत आहेत?’ हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. अहवालामुळे मुंबईतील आमदारांच्या विधिमंडळातील सक्रियतेवर आणि सरकारला जाब विचारण्याच्या भूमिकेवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे.


No comments:
Post a Comment