
मुंबई JPN NEWS - सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांवरून वंचित बहुजन आघाडी प्रणित मुंबई महानगरपालिकेतील म्युनिसिपल कामगार संघ आक्रमक झाला आहे. सोमवारी संघटनेच्या नेतृत्वाखाली हजारो सफाई कामगारांनी मुंबई महापालिका मुख्यालयावर आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. आयुक्तांची भेट न मिळाल्याने संतप्त झालेल्या संघटनेने मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी काम बंद आंदोलनाची घोषणा केली आहे.
मोटार लोडरचे स्थलांतर थांबवावे, लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार पात्र वारसांना नोकरी द्यावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेनुसार सफाई कामगारांना घरे द्यावीत आणि अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत, या प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत.
या मागण्यांसंदर्भात संघटनेने महापालिका प्रशासनाकडे आयुक्तांच्या भेटीसाठी तीन वेळा मागणी केली होती. अखेर २४ ऑगस्ट रोजी भेट देण्याचे मान्य करण्यात आले होते. या बैठकीसाठी ॲड. प्रकाश आंबेडकर हे पुण्याहून मुंबईत आले होते. मात्र, दुपारी आयुक्त इतर बैठकीत व्यस्त असल्याचे सांगत त्यांची भेट होणार नसल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले.
आयुक्तांऐवजी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेण्यास सांगण्यात आल्याने कामगार संतप्त झाले. त्यानंतर हजारो कामगारांनी महापालिका मुख्यालयात आंदोलन करत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला.
‘ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यास आयुक्त घाबरतात का? प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे?’ असे सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केले. कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वेळ देऊन ऐनवेळी भेट नाकारणे हा सफाई कामगारांचा अपमान असल्याची भूमिका संघटनेने घेतली.
या प्रकाराच्या निषेधार्थ मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासंदर्भात महापालिकेतील मनसेची युनियन, रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील युनियन तसेच कामगार सेनेसोबत चर्चा झाल्याचे संघटनेने सांगितले.
सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी इतर कामगार संघटनांनीही काम बंद आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन म्युनिसिपल कामगार संघाने केले आहे. प्रशासनाने तातडीने कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करून तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.


No comments:
Post a Comment