
मुंबई JPN NEWS - महाराष्ट्रातील BHMS, BHMS-CCMP, होमिओपॅथिक तसेच AYUSH डॉक्टरांच्या विविध प्रश्नांसाठी इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने १८ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी महाआंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्रातील सर्व संबंधित डॉक्टरांनी मोठ्या संख्येने सकाळी १० वाजता मंत्रालय, मुंबई येथे उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. योगेश भालेराव यांनी केले आहे.
BHMS-CCMP डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेचा मुद्दा या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे. पात्र BHMS-CCMP डॉक्टरांना शासनाच्या निर्णयानुसार नोंदणीचा मार्ग स्पष्ट असतानाही उर्वरित पात्र डॉक्टरांच्या नोंदणीबाबत महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून विलंब आणि टाळाटाळ का केली जात आहे, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.
शासनाने जारी केलेले आदेश तसेच न्यायालयीन निर्देश यांची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. आदेशांच्या अंमलबजावणीत कोणत्याही स्तरावर अडथळे निर्माण होत असल्यास त्याची तात्काळ चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या प्रशासक डॉ. विंकी रुग्वानी यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी आणि शासनाच्या आदेशांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
तसेच, IMA आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषद यांच्यात कथित साटेलोटे असल्याच्या आरोपांचीही निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
हा संघर्ष कोणत्याही वैद्यकीय शाखेविरोधात नसून पात्र डॉक्टरांना कायदेशीर हक्क, पारदर्शक नोंदणी प्रक्रिया आणि समान संधी मिळावी यासाठी असल्याचे इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
‘चलो मंत्रालय, चलो महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’ या घोषणेसह होणाऱ्या या आंदोलनात महाराष्ट्रातील BHMS, BHMS-CCMP आणि AYUSH डॉक्टरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. योगेश भालेराव यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment