
मुंबई JPN NEWS - भारतीय स्वातंत्र्याच्या ७९व्या वर्धापन दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज, १५ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापौरांनी मुंबईकरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत ‘विकसित भारत २०४७’च्या प्रवासात विकसित मुंबई घडविण्याचा संकल्प व्यक्त केला.
ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका मुख्यालयासमोरील सर फिरोजशहा मेहता यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मुंबई अग्निशमन दल आणि महानगरपालिका सुरक्षा पथकाच्या वतीने महापौरांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे, डॉ. विपिन शर्मा, अभिजीत बांगर, डॉ. अविनाश ढाकणे, नगरसेविका तथा माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईकरांना संबोधित करताना महापौरांनी स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. मुंबईला जागतिक दर्जाचे, स्वच्छ, स्मार्ट, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक महानगर बनविण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच ‘इझ ऑफ डुईंग बिझनेस’ आणि ‘इझ ऑफ लिव्हिंग’वर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांचा सहभाग, नागरी शिस्त, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांच्या माध्यमातून तंत्रज्ञानाने सक्षम, पर्यावरणपूरक आणि कष्टकऱ्यांचा सन्मान जपणारी मानवी मुंबई घडविण्याचा निर्धार महापौरांनी व्यक्त केला. तसेच ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित राष्ट्रव्यापी उपक्रमात मुंबईकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महानगरपालिका सचिव खात्याच्या ‘वार्षिक प्रकाशन २०२६’चे प्रकाशन महापौरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कै. वासुदेव बाळकृष्ण वरळीकर यांच्या ५४व्या स्मृतिदिनानिमित्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अग्निशमन दलाच्या जवानांचा सत्कार -
स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात मुंबई अग्निशमन दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व जवानांचा विशेष सत्कार करण्यात आला. राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झालेल्या मुंबई अग्निशमन दलातील एकूण १३ अधिकारी व जवानांचा महापौर रितू तावडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
१९ ऑगस्ट २०२५ रोजी चेंबूर येथे सुमारे ४० ते ५० फूट उंचीवर बंद पडलेल्या मोनोरेलमध्ये तब्बल ५८२ प्रवासी अडकले होते. मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि जवानांनी धाडसी आणि अतुलनीय कामगिरी करत या सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका केली होती. या उल्लेखनीय बचावकार्याची दखल घेत संबंधित १३ अधिकारी व जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे.
या कामगिरीबद्दल प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी अनिल परब, विभागीय अग्निशमन अधिकारी एम. व्ही. सावंत, वरिष्ठ केंद्र अधिकारी आय. के. कांबळे, केंद्र अधिकारी वाय. एच. पवार, डी. ए. भोसले, यंत्रचालक राजेश राणे, महेश गुडुलकर तसेच अग्निशामक रमेश कोळी, हर्षल कटके, चिंतामणी खांडेकर, विकी सरवदे आणि सुदर्शन पावडे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे.
महापौर रितू तावडे यांनी सर्व पुरस्कारप्राप्त अधिकारी व जवानांचे अभिनंदन करत त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याचा गौरव केला.


No comments:
Post a Comment