
मुंबई JPN NEWS - सायन येथील प्रतीक्षा नगर परिसरातील रघुनाथ विठ्ठल चव्हाण मैदानात गॅझेबो (बसण्यासाठीची संरचना) कोसळून पाच जण जखमी झाल्याची घटना आज बुधवारी (१२ ऑगस्ट) सायंकाळी घडली. जखमींना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाला सायंकाळी ४.४८ वाजता प्रतीक्षा नगर येथील माळा गार्डन, टी/१८ इमारतीसमोरील संरचना कोसळल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला या घटनेत तीन ते चार जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर घटनास्थळी पाहणी केल्यानंतर GI फ्रेमच्या सांगाड्यावर सिमेंट स्लॅब असलेला गॅझेबो कोसळल्याचे स्पष्ट झाले.
या दुर्घटनेत धोंडीराम घोपकर (६५), गणपत आंबोळे (७९), प्रमिला जाधव (६८), लक्ष्मी शितलिया (६५) आणि सुनीता मोरे (६४) हे पाच जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच जखमींना खासगी वाहनांमधून सायन रुग्णालयात नेण्यात आले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, रघुनाथ विठ्ठल चव्हाण मैदानाच्या शेजारी मुंबई बँकेच्या सहकार भवनाचे बांधकाम सुरू असून, तेथे मोठ्या प्रमाणावर फिलिंगचे काम सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या कामामुळे होणाऱ्या जोरदार दणक्यांमुळे परिसरातील इमारती आणि संरचनांना तडे गेल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. गॅझेबो कोसळण्याच्या घटनेचा आणि शेजारी सुरू असलेल्या बांधकामाचा काही संबंध आहे का, याची प्रशासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास आता महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणे अपेक्षित आहे.


No comments:
Post a Comment