कुर्ला भूस्खलन दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू; ७ जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 August 2026

कुर्ला भूस्खलन दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू; ७ जखमी

मुंबई JPN NEWS - कुर्ला पश्चिम येथील चिराग नगर, गौसिया चाळ परिसरात बुधवारी पहाटे झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. जखमींवर कुर्ला भाभा आणि राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बुधवारी पहाटे सुमारे ३.४८ वाजता गौसिया चाळ परिसरात भूस्खलन झाले. डोंगरउतारावरील माती आणि ढिगाऱ्याचा काही भाग चाळीतील २ ते ३ खोल्यांवर कोसळला. दुर्घटनेनंतर ६ ते ८ जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची प्राथमिक माहिती मिळाल्याने तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

मुंबई अग्निशमन दलाने पहाटे ४.३२ वाजता दुर्घटनेला लेव्हल-२ घोषित केले. BMC अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका, NDRFचे पथक आणि BMCचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुमारे ५० BMC कर्मचारी आणि NDRF जवान बचावकार्यात सहभागी असून, विशेष बचाव साहित्याच्या मदतीने ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे.

७ जणांचा मृत्यू - 
राजावाडी रुग्णालयाच्या माहितीनुसार, मोहम्मद समीर अन्सारी (१४), साहिल हुसेन अब्दुल काझी (१९), ४५ वर्षीय अज्ञात व्यक्ती, अबान आरिफ शेख (२), मनत आरिफ शेख (४), मरजिना आरिफ शेख (२७) आणि विकेत रमेश यादव (२७) यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

७ जखमींवर उपचार - 
कुर्ला भाभा रुग्णालयात सोहेल अन्सारी (१८), मोहम्मद अन्सारी (१४), नईमुद्दीन इक्बाल खान (२८) आणि साजिद अन्सारी (१६) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तर राजावाडी रुग्णालयात फराना दिलबर खान (२८), दिलबर अमनुल्ला खान (३८) आणि शमीन मुस्लिम खान (२६) यांच्यावर उपचार सुरू असून तिघांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, घटनास्थळाचा मार्ग अत्यंत अरुंद असल्याने बचाव पथकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

दरम्यान, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS