
मुंबई JPN NEWS - गोवंडी पूर्वेतील शिवाजी नगर येथील नटवर पारेख कंपाऊंडमधील म्हाडा वसाहतीच्या इमारत क्रमांक ८बीच्या टेरेसवरील भिंतीचा बाहेरील प्लास्टरचा भाग कोसळल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेत रस्त्यावरून जाणारी १७ वर्षीय मुलगी जखमी झाली असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
ही घटना ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.५४ वाजता घडली. ग्राउंड प्लस सात मजली इमारतीच्या टेरेसवरील parapet wall च्या बाहेरील प्लास्टरचा काही भाग अचानक कोसळला. तसेच भिंतीचा काही भाग धोकादायक स्थितीत लोंबकळत असल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, म्हाडा कर्मचारी, १०८ रुग्णवाहिका आणि पालिका विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. धोकादायकरीत्या लोंबकळणारा उर्वरित भाग बांबू आणि प्रतिबंधक साधनांच्या मदतीने खाली पाडण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीने घटनास्थळाचा परिसर बंदिस्त करण्यात आला.
दरम्यान, कोसळलेल्या भागाच्या धडकेत एक १७ वर्षीय मुलगी जखमी झाली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, तिला अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच खासगी वाहनातून सायन रुग्णालयात नेण्यात आले.
सायन रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काजल जैस्वाल (१७) हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे.
या घटनेत आणखी दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. रणजित सिंह (५३) यांना किरकोळ दुखापत झाली, तर निशांत सिंह यांच्या कपाळावर आणि पाठीवर दुखापत झाली. दोघांनीही वैद्यकीय सल्ल्याविरोधात रुग्णालयातून निघून जाण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, इमारतीच्या टेरेसवरील धोकादायक भाग हटवून परिसर सुरक्षित करण्यात आला असून, म्हाडा आणि पालिका प्रशासनाकडून पुढील आवश्यक कार्यवाही केली जात आहे.


No comments:
Post a Comment