
मुंबई JPN NEWS - बांद्रे पश्चिम येथील जॉन बाप्टिस्ट रोडवर भरधाव इनोव्हा क्रिस्टाने रस्ता ओलांडणाऱ्या ८ वर्षीय मुलाला जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी, ३० ऑगस्ट रोजी दुपारी सव्वादोन ते अडीचच्या सुमारास जिजामाता गार्डनसमोर घडली. या प्रकरणी बांद्रे पोलिसांनी महिला कारचालक मेघा रावल (वय अंदाजे ४५) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. मृत मुलाचे नाव अंश रविंद्र गुप्ता (वय ८) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंश हा जिजामाता गार्डनसमोर रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी आरोपी महिला चालक मेघा रावल ही तिच्या ताब्यातील इनोव्हा क्रिस्टा कार चालवत होती. मोबाईलवर बोलत असताना अतिवेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवून तिने अंशला जोरदार धडक दिल्याचा आरोप आहे. धडकेनंतर वाहन अंशच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर अंशला तातडीने उपचारासाठी Holy Family Hospital येथे दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर बांद्रे पोलिसांनी आरोपी महिला चालकाविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक 1843/2026 नोंदवला आहे. तिच्यावर भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम 105, 281, 125 तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातास कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर आणि चालकाच्या निष्काळजीपणाचा पोलीस तपास करत आहेत. आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून, पुढील तपास बांद्रे पोलीस ठाण्याच्या पथकाकडून सुरू आहे.


No comments:
Post a Comment