घाटकोपरमध्ये अत्याधुनिक टिळकमार्ग महापालिका शाळा संकुलाचे लोकार्पण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 August 2026

घाटकोपरमध्ये अत्याधुनिक टिळकमार्ग महापालिका शाळा संकुलाचे लोकार्पण


मुंबई JPN NEWS - घाटकोपर (पूर्व) येथील टिळकमार्ग परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक टिळकमार्ग महानगरपालिका शाळा इमारत संकुलाचे लोकार्पण आज, १६ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि स्थानिक आमदार पराग शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या नवीन शाळा संकुलामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सर्वसमावेशक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

या कार्यक्रमाला नगरसेविका राखी जाधव, नगरसेविका अर्चना भालेराव, नगरसेवक धर्मेश गिरी, शिक्षण समिती सदस्य योजना ठोकळे, उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी सुजाता खरे, उपशिक्षणाधिकारी सायली सुर्वे, एन विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्यासह अधिकारी, विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, आपण प्रतिनिधित्व करीत असलेल्या प्रभाग क्रमांक १३२ मधील हे शाळा संकुल आधुनिक आणि सुसज्ज स्वरूपात उभारण्यात आले आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांसारख्या संस्थांना भेट देण्याची संधी मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महापालिका शाळांमधून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात नाव कमावत आहेत. आपण स्वतः आणि उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर या देखील महापालिका शाळेच्या विद्यार्थिनी असल्याचे त्यांनी नमूद केले.

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगाच्या २७ वस्तू विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जात असून, विद्यार्थ्यांमध्ये गणित आणि विज्ञान विषयांची आवड निर्माण करण्यासाठी ‘सायन्स सोमवार’ आणि ‘गणित गुरुवार’ असे उपक्रम राबवले जात असल्याचे महापौरांनी सांगितले. विद्यार्थ्यांना सकारात्मक आणि ऊर्जावान वातावरण मिळावे, यासाठी अशा आधुनिक शाळा संकुलांची उभारणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, स्थानिक आमदार पराग शाह यांनी शाळा संकुलाच्या विविध उपयोगांसाठी वैयक्तिक ५ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. नवीन इमारतीची बांधणी आणि रचना चांगली असून, परिसरातील स्वच्छता कायम राखण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासह त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

७८९ विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा - 
टिळकमार्ग महानगरपालिका शाळा संकुलाची नवीन इमारत तळमजला अधिक सहा मजल्यांची असून, सध्या या इमारतीत चार महापालिका शाळा कार्यरत आहेत. या चार शाळांमध्ये बालवाडीसह एकूण ७८९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

इमारतीमध्ये ३८ वर्गखोल्या, २५ लहान खोल्या, एक सभागृह आणि १४ इतर सुविधा खोल्या आहेत. टिळकमार्ग हिंदी, टिळकमार्ग मराठी, कामराजनगर हिंदी आणि कामराजनगर मराठी या चार शाळा येथे कार्यरत आहेत. त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाची नवीन बालवाडीही सुरू करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संकुलात संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, खगोलशास्त्र प्रयोगशाळा, ग्रंथालय, मनोवैज्ञानिक थेरपी लॅब आणि व्हर्च्युअल क्लासरूम यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कामराज नगर, विक्रांत सर्कल, जुना आरटीओ परिसर, रमाबाई सहकार नगर, राजावाडी, रेतीबंदर, पिस्टम सागर, नेताजी नगर, छेडा नगर, गारोडिया नगर, टिळकमार्ग, रमाबाई नगर, नालंदा, चेंबूर आणि विक्रोळी आदी परिसरांतील विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.

विविध परिसरांतील विद्यार्थ्यांना एकाच छताखाली गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सर्वसमावेशक शिक्षण मिळावे, या उद्देशाने उभारण्यात आलेले टिळकमार्ग शाळा संकुल भविष्यातील शिक्षणाच्या गुणवत्तेला नवा आयाम देणारे ठरणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS