गडचिरोलीत ‘ग्राउंड झिरो’वर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा पाहणी दौरा; पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 August 2026

गडचिरोलीत ‘ग्राउंड झिरो’वर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा पाहणी दौरा; पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश


गडचिरोली JPN NEWS - जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्ते, पूल आणि विविध पायाभूत विकासकामांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ग्राउंड झिरोवर जाऊन आढावा घेतला. दिवस-रात्र सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करत मंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून प्रत्येक प्रकल्पाच्या प्रगतीची आणि कामाच्या गुणवत्तेची माहिती घेतली.

या दौऱ्यात गडचिरोलीतील विविध रस्ते-पूल, खनिज वाहतूक मार्गिका, आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेअंतर्गत सुरू असलेले प्रकल्प, पूर्ण झालेली विकासकामे तसेच अतिवृष्टीमुळे बाधित रस्ते आणि पुलांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

कोठी-कोरणार पूल दुर्घटनेनंतर मोठा निर्णय - 
कोठी-कोरणार पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश मंत्री भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विकासकामे केवळ पूर्ण करणे पुरेसे नसून त्यांची गुणवत्ता आणि नागरिकांची सुरक्षितता सर्वोच्च असली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

निकृष्ट दर्जाच्या कामांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. गुणवत्तेत तडजोड करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही मंत्र्यांनी दिला.

छोट्या पुलांसाठी स्वतंत्र पॅकेजची मागणी - 
गडचिरोलीतील छोटे-मोठे पूल, नाले आणि ओढ्यांवरील पुलांच्या कामांसाठी स्वतंत्र ‘पूल पॅकेज’ मंजूर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

चामोर्शी-हरणघाट रस्त्याची पाहणी - 
दौऱ्यादरम्यान मंत्र्यांनी चामोर्शी–हरणघाट रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच कोनसरी येथील औद्योगिक प्रकल्पाला भेट देऊन तेथील कामाची माहिती घेतली. गोंडवाना विद्यापीठाच्या अडपल्ली येथील युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसाठी प्रस्तावित जागेचीही पाहणी करण्यात आली. सर्व विकासकामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

वेग, गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर भर - 
प्रत्यक्ष पाहणी करून केवळ कागदोपत्री आढावा न घेता कृतीवर भर देण्याचा निर्धार या दौऱ्यातून व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोलीच्या विकासाला वेग देताना वेग, गुणवत्ता आणि नागरिकांची सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS