राजावाडी रुग्णालयातील तीन अर्भकांच्या मृत्यूवर पालिकेचा खुलासा; ‘उपचारात कोणतीही हलगर्जी नाही’ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 August 2026

राजावाडी रुग्णालयातील तीन अर्भकांच्या मृत्यूवर पालिकेचा खुलासा; ‘उपचारात कोणतीही हलगर्जी नाही’


मुंबई JPN NEWS - घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात तीन अर्भकांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर उपचारात हलगर्जीपणाचे आरोप होत असताना, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत. तिन्ही प्रकरणांमध्ये रुग्ण आणि नवजात बालकांना आवश्यक उपचार देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केल्याचा दावा पालिकेने केला आहे.

पालिकेच्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी राजावाडी रुग्णालयाच्या युनिट-३ मध्ये एकूण १३ प्रसूती झाल्या. यामध्ये आठ सिझेरियन आणि पाच नैसर्गिक प्रसूतींचा समावेश होता. यापैकी दोन प्रकरणे प्रसूतीपूर्व गर्भमृत्यूची (IUFD), तर एका प्रकरणात नवजात बालकाचा मृत्यू (Neonatal Death) झाला.

पहिल्या प्रकरणात सोनोग्राफीद्वारे तातडीने निदान - 
हिरा भंडारी या ३७ आठवड्यांच्या गर्भवती रुग्णाला यापूर्वी दोन वेळा सिझेरियन झाले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर प्राथमिक तपासणी करताना गर्भाचे हृदयाचे ठोके (FHS) निश्चितपणे ऐकू आले नाहीत. त्यामुळे विलंब न करता सोनोग्राफी करण्यात आली. त्यामध्ये गर्भाशयातच गर्भाचा मृत्यू (IUFD) झाल्याचे निदान झाले.

केवळ रुग्णालयात दाखल झाल्यानंतर FHS ऐकू न आल्याने गर्भमृत्यू रुग्णालयातच झाला, असा निष्कर्ष काढता येणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यासाठी पूर्वीचे वैद्यकीय अहवाल, सोनोग्राफी आणि इतर नोंदी तपासणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

दुसऱ्या रुग्णाचे १५ दिवस फॉलोअपच झाले नाही -
रेहाना बेगम खान या ३३ आठवड्यांच्या गर्भवती असून त्यांना Gestational Diabetes आणि Hypertension हे जोखमीचे घटक होते. अशा परिस्थितीत नियमित तपासणी आणि वैद्यकीय देखरेख आवश्यक असते. रुग्णाला नियमित फॉलोअपचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, त्या सुमारे १५ दिवस वैद्यकीय पाठपुराव्यासाठी रुग्णालयात आल्या नव्हत्या.

त्यानंतर रुग्णालयात आल्यानंतर उपलब्ध सोनोग्राफी अहवालात IUFD आढळून आले. त्यामुळे या कालावधीत रुग्णालयाने fetal monitoring केले नाही, असा आरोप करणे योग्य नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

तिसऱ्या प्रकरणात MSL नंतर तातडीने सिझेरियन - 
नुसरत जहां खान या ४० आठवडे दोन दिवसांच्या गर्भावस्थेत होत्या. प्रसूतीसाठी induction of labour करण्यात आले होते. Induction पूर्वी आणि नंतर करण्यात आलेल्या NST तपासण्या समाधानकारक असल्याचे पालिकेने सांगितले.

मात्र, सायंकाळी रुग्णेला Meconium Stained Liquor (MSL) आढळून आले. त्यावेळी दुसऱ्या MSL रुग्णाचे सिझेरियन सुरू असल्याने दुसरे शस्त्रागार उपलब्ध करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली. दरम्यान, रुग्णेला शस्त्रागार विभागात हलविताना NST मध्ये fetal heart rate मध्ये decelerations आढळले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने LSCS करण्यात आले. शस्त्रक्रियेदरम्यान नवजात बाळाची प्रकृती गंभीर असल्याचे आढळून आले. बालरोगतज्ज्ञांनी तातडीने intubation आणि resuscitation करून बाळाला NICUमध्ये दाखल केले. मात्र, सुमारे दीड ते दोन तासांच्या उपचारानंतरही बाळाचा मृत्यू झाला.

‘उपचारात दुर्लक्ष झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत नाही’ - 
या तिन्ही प्रकरणांबाबत उपलब्ध वैद्यकीय नोंदींच्या आधारे रुग्णालय प्रशासनाकडून उपचारात विलंब किंवा हलगर्जी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. आवश्यक तपासण्या, प्रसूतीपूर्व देखरेख, सिझेरियन तसेच नवजात बालकांसाठी resuscitation आणि NICU उपचार करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणांमध्ये मृत्यूची नेमकी कारणे निश्चित करण्यासाठी antenatal records, सोनोग्राफी अहवाल, गर्भावस्थेतील जोखमीचे घटक आणि उपलब्ध वैद्यकीय नोंदी यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

राजावाडीतील तीन अर्भकांच्या मृत्यूने खळबळ उडाल्यानंतर पालिकेच्या या स्पष्टीकरणामुळे आता या प्रकरणातील वैद्यकीय नोंदी आणि उपचार प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS