कर्तव्यावर मृत्यू झालेल्या BMC कामगाराच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत द्या; म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 August 2026

कर्तव्यावर मृत्यू झालेल्या BMC कामगाराच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत द्या; म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी


मुंबई JPN NEWS | १० ऑगस्ट २०२६ - 
कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झालेल्या महापालिका कामगार पांडुरंग तोडकर यांच्या कुटुंबीयांना तातडीने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच त्यांच्या वारसाला तीन महिन्यांच्या आत महापालिकेत नोकरी देण्यात यावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.

महापालिकेच्या एफ/दक्षिण विभागातील कीटकनाशक खात्यात कार्यरत असलेले पांडुरंग तोडकर हे इमारतीवरील पाण्याची टाकी तपासणीसाठी गेले असताना अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

पाण्याच्या टाक्यांची तपासणी करताना कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे आणि अशा प्रकारचे काम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक असल्याचे डॉ. कांबळे-बापेरकर यांनी म्हटले आहे. मात्र, तोडकर यांना हे काम करताना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली नव्हती तसेच घटनास्थळी कोणताही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याची माहिती मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तोडकर यांना जबरदस्तीने पाण्याची टाकी तपासणीच्या कामासाठी पाठविण्यात आले होते का, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. निष्काळजीपणामुळे कामगाराचा नाहक बळी गेला असल्यास त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करतानाच दिवंगत कामगाराच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी आणि त्यांच्या वारसाला तीन महिन्यांच्या आत महापालिकेत नोकरी द्यावी, असे डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS