
मुंबई JPN NEWS | १० ऑगस्ट २०२६ -
यंदाचा गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
ही बैठक दुपारी २.३० वाजता नाना चौक येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी विभाग कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात होणार आहे. गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी आणि समन्वय समितीचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
यंदा १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्सवाच्या काळातील विविध उपक्रमांचे नियोजन, प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये समन्वय, तसेच आवश्यक सूचना व मार्गदर्शन याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.
गिरगाव चौपाटीसह मुंबईतील विविध विसर्जन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियोजन, सुरक्षा आणि स्वच्छता याबाबत आधीपासून योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये अधिक चांगला समन्वय साधण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार असल्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
वाहतूक, स्वच्छता आणि सुरक्षेवर भर -
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टच्या बसफेऱ्यांमध्ये वाढ, तसेच मुंबई मेट्रोच्या फेऱ्या आणि धावण्याच्या वेळेत वाढ करण्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.
याशिवाय शहरातील विविध ठिकाणी सार्वजनिक फिरत्या शौचालयांची सुविधा, सार्वजनिक ठिकाणे आणि समुद्रकिनाऱ्यांवरील स्वच्छतेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ, गणेश मंडपांसाठी महापालिकेच्या आवश्यक परवानग्या आणि वीजपुरवठा याबाबतही चर्चा केली जाणार आहे.
समुद्रात गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी दुर्घटना टाळण्यासाठी अधिक संख्येने जीवरक्षक व सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याच्या उपाययोजनांवरही विचार करण्यात येणार आहे.
बैठकीला गणेश मंडळे व समन्वय समितीचे अधिकारी, दक्षिण मुंबईतील नगरसेवक, पोलीस, महापालिकेच्या डी विभागातील संबंधित अधिकारी, वाहतूक पोलीस, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, अग्निशमन दल, बेस्ट आणि ग्राहक सेवा केंद्रातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी बैठकीला उपस्थित राहून आपल्या सूचना व समस्या प्रशासनासमोर मांडाव्यात, असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment