BMC Gen-Z Fellowshipचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने करा; भीम आर्मीची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 August 2026

BMC Gen-Z Fellowshipचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने करा; भीम आर्मीची मागणी


मुंबई JPN NEWS - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या Gen-Z Fellowship Programmeमध्ये व्यापक बदल करून त्याचे नाव ‘राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप कार्यक्रम’ असे करण्यात यावे, तसेच फेलोशिपच्या जागा वाढवून किमान ५० हजार करण्यात याव्यात, अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशन – महाराष्ट्रने केली आहे.

या मागण्यांसंदर्भात भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक कांबळे यांनी महापालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे. मुंबईतील अधिकाधिक युवकांना संधी मिळावी आणि महापालिकेच्या विविध विभागांमध्ये अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग व्हावा, यासाठी फेलोशिपच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

फेलोशिपसाठीची वयोमर्यादा ४५ वर्षांपर्यंत वाढवावी, तसेच मुंबईत वास्तव्यास असलेल्या आणि महाराष्ट्रात जन्मलेल्या व वाढलेल्या पात्र उमेदवारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी आहे. मुंबईच्या नागरी प्रश्नांची प्रत्यक्ष माहिती असलेल्या स्थानिक युवकांना प्रथम संधी मिळावी, असेही संघटनेने म्हटले आहे.

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या दहावी, बारावी आणि पदवीधर पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या अनुभवाच्या आधारे फेलोशिपमध्ये प्राधान्य देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय SC, ST, OBC, VJNT, EWS, महिला, दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय्य प्रतिनिधित्व देण्याची मागणी करण्यात आली आहे. फेलोशिपची निवड प्रक्रिया पारदर्शक व सामाजिक न्यायाच्या तत्त्वांनुसार राबवावी आणि उमेदवारांकडून कोणतेही अर्ज किंवा परीक्षा शुल्क आकारू नये, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

फेलोशिपच्या माध्यमातून युवकांना पाणी, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, रस्ते, पर्यावरण, महिला सुरक्षा, रोजगार आणि इतर नागरी प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळावी. तसेच फेलोशिप पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र व अनुभव प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी आहे.

“मुंबईच्या विकासात वर्षानुवर्षे योगदान देणाऱ्या कंत्राटी कामगारांना त्यांच्या अनुभवाच्या आधारे संधी मिळणे आणि स्थानिक युवकांना रोजगाराभिमुख अनुभव मिळणे ही काळाची गरज आहे. महापालिका प्रशासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा,” अशी मागणी अशोक कांबळे यांनी केली.

दरम्यान, मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास संविधानिक आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही भीम आर्मी भारत एकता मिशन – महाराष्ट्रच्या वतीने देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS