
मुंबई JPN NEWS - मुंबईकरांना वीजपुरवठा करणाऱ्या BEST उपक्रमाने सौर आणि हरित ऊर्जेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. BESTने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI)सोबत 31 ऑगस्ट 2026 रोजी 220 मेगावॅट सौर ऊर्जा आणि 110 MW/440 MWh क्षमतेच्या Energy Storage System (ESS) आधारित वीज खरेदीचा करार केला आहे. या करारामुळे BESTच्या अक्षय ऊर्जेच्या वापरात लक्षणीय वाढ होणार आहे.
या करारावर BESTच्या महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी, SECIचे कार्यकारी संचालक अतुल्य नाईक आणि उपमहाव्यवस्थापक संजीव सिंह यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी BESTच्या विद्युत विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
₹2.87 प्रति युनिट दराने 25 वर्षे हरित ऊर्जा -
करारानुसार BESTला ₹2.87 प्रति युनिट या दराने 25 वर्षांच्या कालावधीसाठी हरित ऊर्जा उपलब्ध होणार आहे. ही अक्षय ऊर्जा महाराष्ट्रातील विविध Renewable Energy (RE) प्रकल्प विकासकांकडून उपलब्ध करून घेतली जाणार आहे. या करारामुळे BESTला दीर्घकालीन स्वरूपात हरित ऊर्जा उपलब्ध होण्याबरोबरच वातावरणातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासही मदत होणार आहे.
अक्षय ऊर्जेचा वाटा 33 वरून 43 टक्क्यांवर -
सध्या BESTच्या सुमारे 1,000 मेगावॅट वीज गरजेपैकी 33 टक्के ऊर्जा अक्षय ऊर्जा स्रोतांमधून मिळते. नव्या करारामुळे BESTच्या एकूण ऊर्जेतील अक्षय ऊर्जेचा वाटा 43 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. नवीन करार हा Renewable Purchase Obligation (RPO) अंतर्गत निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे.
संध्याकाळच्या Peak Demandमध्ये स्वस्त वीज -
मुंबईत संध्याकाळच्या वेळेत विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या Peak Demandच्या काळात ऊर्जा साठवण प्रणालीचा मोठा फायदा BESTला होणार आहे.
110 मेगावॅट क्षमतेच्या ESSमध्ये 440 मेगावॅट-तास ऊर्जा साठवता येणार असल्याने गरजेनुसार साठवलेली ऊर्जा वापरणे शक्य होईल. त्यामुळे विजेची मागणी सर्वाधिक असताना तुलनेने स्वस्त दरात वीज उपलब्ध करून घेण्यास मदत होणार आहे. याचा परिणाम BESTच्या वीज खरेदी खर्चावर होऊन वीजदर नियंत्रणात ठेवण्यासही हातभार लागण्याची अपेक्षा आहे.
मुंबईच्या हरित ऊर्जेला चालना -
सौर ऊर्जेचा वापर वाढवण्याबरोबरच ऊर्जा साठवण तंत्रज्ञानाचा समावेश असलेला हा करार BESTच्या ऊर्जा व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हरित ऊर्जेचा वाटा 43 टक्क्यांपर्यंत वाढल्याने कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार असून, मुंबईच्या शाश्वत ऊर्जा व्यवस्थेकडे BESTचे आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.


No comments:
Post a Comment