
मुंबई JPN NEWS - मध्य रेल्वेने विनातिकीट आणि अवैध तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कारवाई तीव्र केली असून, एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांत तब्बल २०.४७ लाख प्रवाशांना पकडण्यात आले आहे. या कारवाईतून रेल्वेने एकूण १५९.३४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २०.०५ लाख प्रकरणांमधून ११६.४६ कोटी रुपये वसूल करण्यात आले होते. त्यामुळे यंदा दंडाच्या उत्पन्नात ३७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. (Central Railway)
मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी संपूर्ण रेल्वे नेटवर्कवर विनातिकीट प्रवास, अवैध तिकीट आणि प्रवासासाठी आवश्यक असलेल्या वैध परवानगीशिवाय प्रवास करणाऱ्यांविरोधात विशेष मोहिमा राबवल्या. या सहा महिन्यांत दररोज सरासरी ११ हजार १८४ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, दररोज ८७ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
मुंबई विभागातून सर्वाधिक दंडवसुली -
विभागनिहाय आकडेवारीनुसार, मुंबई विभागाने सर्वाधिक कारवाई करत १०.११ लाख प्रकरणांमधून ६६.९२ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. भुसावळ विभागात ३.७७ लाख प्रकरणांमधून ३८.९० कोटी रुपये, नागपूर विभागात २.३६ लाख प्रकरणांमधून १७.९३ कोटी रुपये, तर पुणे विभागात २.१३ लाख प्रकरणांमधून १८.६८ कोटी रुपये वसूल करण्यात आले. सोलापूर विभागात १.१० लाख प्रकरणांमधून ७.२७ कोटी रुपये, तर मध्य रेल्वेच्या मुख्यालयाच्या पथकांनी ९९ हजार प्रकरणांमधून ९.६३ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.
सप्टेंबरमध्ये १८.५३ कोटींचा दंड -
सप्टेंबर २०२६ या एका महिन्यातही मध्य रेल्वेची तिकीट तपासणी मोहीम सुरू होती. या महिन्यात विनातिकीट किंवा अवैध तिकिटांसह प्रवास करणाऱ्या २.४४ लाख प्रवाशांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून १८.५३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेकडून स्थानकांवरील नियमित तपासणी, अचानक तपासणी, संपूर्ण स्थानक सील करून केली जाणारी ‘फोर्ट्रेस’ तपासणी, सखोल तपासणी आणि विशेष ‘मेगा तिकीट तपासणी’ मोहिमा राबवल्या जात आहेत. मेल आणि एक्स्प्रेस गाड्या, पॅसेंजर गाड्या, विशेष गाड्या तसेच मुंबई व पुणे विभागांतील उपनगरीय रेल्वे सेवांमध्येही या मोहिमा राबवण्यात येत आहेत.
विनातिकीट प्रवासासाठी किमान दंडाची रक्कम २५० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आल्यानंतरही रेल्वेने तपासणी मोहीम अधिक तीव्र ठेवली आहे. वैध तिकिटाशिवाय प्रवास करणे हा रेल्वे कायद्यानुसार दंडनीय प्रकार असून, अशा प्रवासामुळे रेल्वेच्या महसुलावर परिणाम होतो. या महसुलाचा उपयोग प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी केला जातो.
मध्य रेल्वेने प्रवाशांना गैरसोय आणि दंड टाळण्यासाठी योग्य व वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. विनातिकीट प्रवासाबाबत कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करत, सुरक्षित, सुलभ आणि सन्मानजनक प्रवासासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment