
पुणे/मुंबई JPN NEWS - MPSC परीक्षेतील कथित अनियमितता आणि विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यांनंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. MPSC विद्यार्थ्यांना कथितरित्या ‘गाढव’ संबोधणे, आंदोलनाला ‘नाईट लाईफ’ची उपमा देणे तसेच आंदोलनाशी संबंधित कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांनी नवनाथ बन यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. कष्टकरी आणि अभ्यासू विद्यार्थ्यांचा अपमान करणारे वक्तव्य केल्याबद्दल बन यांनी MPSC विद्यार्थ्यांची आणि महाराष्ट्राची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी मातेंनी केली आहे.
“आई-वडिलांचे कष्ट डोळ्यांसमोर ठेवून अनेक विद्यार्थी पुण्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहून रात्रंदिवस अभ्यास करतात. अशा विद्यार्थ्यांना ‘गाढव’ म्हणणे हा महाराष्ट्रातील युवा शक्तीचा अपमान आहे,” अशी टीका मातेंनी केली.
MPSC परीक्षांबाबत निर्माण झालेले वाद, परीक्षांच्या तारखांमधील गोंधळ, कथित पेपरफुटी आणि निकालांना होणारा विलंब यासाठी सरकारला जबाबदार धरत विद्यार्थ्यांच्या संघर्षाची खिल्ली उडवू नये, असेही मातेले यांनी म्हटले. विद्यार्थ्यांच्या हातात आज पेन असून भविष्यात ते आपल्या मतदानाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना उत्तर देतील, असा इशाराही त्यांनी दिला.
‘नाईट लाईफ’च्या आरोपावरून वाद -
दरम्यान, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत पुण्यातील MPSC आंदोलनावर गंभीर आरोप केले होते. आंदोलनाच्या नावाखाली काही ठिकाणी गैरप्रकार, मद्यपान आणि धांगडधिंगा सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलनाला ‘नाईट लाईफ’ची उपमा दिली. तसेच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या आंदोलनातील सहभागावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
बन यांनी ३ ऑक्टोबरच्या रात्री शिवराज मोरे आंदोलनस्थळी उपस्थित असल्याचा आणि त्यानंतर कोरेगाव पार्क परिसरात गेल्याचा दावा केला. यावरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे आमदार रोहित पवार यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले. आंदोलनात विद्यार्थी किती आणि राजकीय कार्यकर्ते किती, असा सवाल त्यांनी केला.
शिवराज मोरेंचा पलटवार; अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा इशारा -
नवनाथ बन यांच्या आरोपांना शिवराज मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. कोरेगाव पार्क परिसरातील एका तरुणीला त्रास होत असल्याने तिच्या मदतीसाठी आपण घटनास्थळी गेलो होतो, असा दावा मोरे यांनी केला. संबंधित तरुणीनेही नंतर बन यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे सांगितले असून, शिवराज मोरे मदतीसाठी आले होते, असे स्पष्ट केले.
या प्रकरणात अर्धवट व्हिडिओ प्रसारित करून बदनामी करण्यात आल्याचा आरोप मोरे यांनी केला. नवनाथ बन यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
‘५ हजार कोटींचा दावा करा’ – नवनाथ बन यांचे प्रत्युत्तर...
शिवराज मोरे यांच्या कायदेशीर कारवाईच्या इशाऱ्यानंतर नवनाथ बन यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. “अब्रुनुकसानीचा दावा करायचा असेल तर ५ हजार कोटींचा दावा करा,” असे आव्हान बन यांनी दिल्याचे वृत्त आहे.
आपण संबंधित तरुणीवर कोणताही आरोप केला नसून आपले प्रश्न शिवराज मोरे आणि आंदोलनातील कथित गैरप्रकारांबाबत असल्याचे बन यांनी स्पष्ट केले. आंदोलनस्थळी कथितरित्या ड्रग्ज किंवा गैरप्रकार आढळले असतील तर त्याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली का, असा सवालही त्यांनी केला. या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
उच्च न्यायालयाची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर महत्त्वाची टिप्पणी -
या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने MPSC आंदोलनाचीही दखल घेतली आहे. न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांमध्ये गांभीर्य असल्याचे नमूद करत “हे विद्यार्थी आहेत, समाजकंटक नाहीत”, असे मौखिक निरीक्षण नोंदवले. परीक्षेच्या प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा संशय असल्यास विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र आंदोलनामुळे रस्ते आणि पुणेकरांची गैरसोय होऊ नये, असे सांगत विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे परतावे, असे आवाहन केले.
राज्य सरकारने MPSC परीक्षांच्या पारदर्शकतेबाबत आणि विद्यार्थ्यांच्या काही मागण्यांबाबत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असून, न्यायालयाने सरकारकडून पुढील कार्यवाहीचा आराखडा मागितला आहे.
दरम्यान, MPSC आंदोलनावरून नवनाथ बन आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच असून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. दुसरीकडे, बन यांनी आपले आरोप योग्य असल्याचा दावा करत संबंधित प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करावी, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या वादात पुढे कायदेशीर कारवाई होते का आणि भाजपकडून या वक्तव्याबाबत अधिकृत भूमिका काय घेतली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.


No comments:
Post a Comment