
मुंबई JPN NEWS - दिवाळीसह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या आतषबाजीला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सार्वजनिक रस्ते, गल्लीबोळ, मुख्य मार्ग आणि इतर सार्वजनिक ठिकाणी फटाके, रॉकेट तसेच अन्य प्रकारची आतषबाजी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश ६ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्रीपासून ४ डिसेंबर २०२६च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.
मुंबई पोलिसांच्या या आदेशामुळे सणासुदीच्या काळात सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडणाऱ्या नागरिकांना आता निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. रस्ते, गल्ली आणि वाहतुकीच्या प्रमुख मार्गांवर आतषबाजी केल्यामुळे नागरिकांना होणारा त्रास, वाहतुकीला निर्माण होणारा अडथळा तसेच संभाव्य अपघात आणि प्रदूषणाचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
फटाक्यांसोबत रॉकेट आणि इतर आतषबाजीवरही बंदी -
पोलिसांच्या आदेशानुसार केवळ पारंपरिक फटाक्यांपुरती ही कारवाई मर्यादित नसून रॉकेट आणि इतर प्रकारच्या आतषबाजीवरही सार्वजनिक रस्ते व मार्गांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सण किंवा अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने आतषबाजी करताना नागरिकांनी पोलिसांच्या आदेशाची दखल घेणे आवश्यक आहे.
हाय-इंटेन्सिटी लेझर, ल्यूमेन लाईट आणि सर्चलाईटवरही निर्बंध -
फटाक्यांसोबतच हाय-इंटेन्सिटी लेझर लाईट्स, ल्यूमेन लाईट्स आणि सर्चलाईट बीम्सच्या वापरावरही सार्वजनिक ठिकाणी निर्बंध घालण्यात आले आहेत. अशा अतितीव्र प्रकाशझोतामुळे वाहनचालक, पादचारी आणि इतर नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः रस्ते आणि वाहतुकीच्या मार्गांकडे तीव्र प्रकाशझोत वळवल्यास अपघाताचा धोका वाढू शकतो.
बॉम्बे हायकोर्टाच्या निर्देशांनंतर पोलिसांची कारवाई -
मुंबई पोलिसांनी हा प्रतिबंधात्मक आदेश बॉम्बे हायकोर्टाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर जारी केला आहे. पर्यावरण आणि सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित सुओ-मोटो जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण तसेच सार्वजनिक ठिकाणी अतितीव्र प्रकाशामुळे निर्माण होणारे धोके नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.
मुंबई पोलिसांच्या उपलब्ध माहितीनुसार, हा आदेश BNSS, 2023 मधील कलम 163 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 10(2) अंतर्गत जारी करण्यात आला आहे.
नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई -
प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात परिस्थितीनुसार संबंधित कायद्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकते. यामध्ये पर्यावरण (संरक्षण) कायदा, स्फोटक कायदा, भारतीय न्याय संहिता (BNS) आणि ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमांतील तरतुदींचा समावेश होऊ शकतो.
४ डिसेंबरपर्यंत निर्बंध -
मुंबई पोलिसांचा हा आदेश ६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ४ डिसेंबर २०२६च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबईतील सार्वजनिक रस्ते, गल्लीबोळ आणि मुख्य मार्गांवर फटाके, रॉकेट किंवा इतर आतषबाजी करण्यास नागरिकांनी टाळावे, तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंधित हाय-इंटेन्सिटी लेझर आणि सर्चलाईट बीम्सचा वापर करू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


No comments:
Post a Comment