
मुंबई JPN NEWS - रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथे खासगी कोचिंग क्लासच्या सहलीदरम्यान समुद्रात बुडून पुण्यातील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर खासगी कोचिंग क्लासेसच्या सहलींच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील ग्लोबल पेरेंट्स टीचर असोसिएशनचे अध्यक्ष रोहित श्यामसुंदर दंडवते यांनी मुख्यमंत्री यांना दोन पानी पत्र पाठवून संबंधित कोचिंग क्लासेसवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिवेआगार दुर्घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित कोचिंग क्लास चालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच संबंधित क्लासची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी दंडवते यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.
शाळा आणि महाविद्यालयांच्या सहलींसाठी शिक्षण विभागाकडून विविध सुरक्षा नियम आणि मार्गदर्शक सूचना लागू आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात शुल्क आकारणाऱ्या खासगी कोचिंग क्लासेसच्या सहलींचे नियोजन, परवानगी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पुरेशी नियंत्रण व्यवस्था नसल्याचा आरोप पालक संघटनेने केला आहे.
खासगी कोचिंग क्लासच्या सहलींसाठी स्वतंत्र आणि कडक एसओपी लागू करण्याची मागणीही पत्रातून करण्यात आली आहे. समुद्रकिनारे, धरणे, किल्ले आणि अन्य धोकादायक पर्यटनस्थळी विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित प्रशासकीय यंत्रणेची परवानगी घेणे बंधनकारक करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दंडवते यांनी पत्रात दिवेआगार येथील दुर्घटनेबरोबरच मुरूड येथे यापूर्वी घडलेल्या दुर्घटनेत १४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा संदर्भ देत, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, असे म्हटले आहे.
खासगी क्लासेसच्या सहलींमध्ये विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षक व पर्यवेक्षकांची संख्या, वाहतूक व्यवस्था, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, स्थानिक प्रशासनाची परवानगी, जलसुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीत बचावाची व्यवस्था याबाबत स्पष्ट नियम निश्चित करावेत, अशी मागणी पालक संघटनेने केली आहे.
“विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या क्लासचालकांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका ग्लोबल पेरेंट्स टीचर असोसिएशनने मांडली आहे.
दरम्यान, सरकारने येत्या १५ दिवसांत खासगी कोचिंग क्लासेसच्या सहलींसाठी कठोर एसओपी लागू करून आवश्यक कार्यवाही न केल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दंडवते यांनी दिला आहे. त्यामुळे दिवेआगार दुर्घटनेनंतर खासगी कोचिंग क्लासेसच्या सहलींच्या नियमनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.


No comments:
Post a Comment