बुद्धांच्या ज्ञानभूमी बोधगयेत प्रथमच आंतरराष्ट्रीय त्रिपिटक पठण सोहळा; २२० सुवर्ण बुद्धमूर्तींचे महादान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 November 2026

बुद्धांच्या ज्ञानभूमी बोधगयेत प्रथमच आंतरराष्ट्रीय त्रिपिटक पठण सोहळा; २२० सुवर्ण बुद्धमूर्तींचे महादान


मुंबई JPN NEWS - तथागत भगवान बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीची पवित्र भूमी असलेल्या बिहारमधील बोधगया येथे प्रथमच २१ व्या आंतरराष्ट्रीय त्रिपिटक चँटिंग सोहळ्याचे (International Tipitaka Chanting Ceremony – ITCC) आयोजन करण्यात येणार आहे. येत्या २ ते १२ डिसेंबर २०२६ या कालावधीत ऐतिहासिक महाबोधी महाविहार परिसरात हा भव्य आंतरराष्ट्रीय बौद्ध महासोहळा पार पडणार आहे. जगभरातील २७ हून अधिक देशांतील सुमारे २५ हजार बौद्ध भिक्षू, भिक्षुणी आणि उपासक-उपासिका या सोहळ्यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या निमित्ताने भारताला जागतिक बौद्ध समुदायाचे यजमानपद भूषविण्याचा मान मिळणार आहे.

मुंबईत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय त्रिपिटक चँटिंग कौन्सिलचे सरचिटणीस भंते विनय रक्खिता आणि कौन्सिलचे सदस्य अमन कांबळे यांनी या सोहळ्याची माहिती दिली. २००६ मध्ये सुरू झालेल्या या जागतिक बौद्ध परंपरेचे आयोजन यंदा प्रथमच भारतात होत असल्याचे त्यांनी सांगितले.

२७ देशांतील बौद्ध अनुयायी एकत्र येणार - 
या महासोहळ्यात म्यानमार, थायलंड, नेपाळ, भारत, व्हिएतनाम, श्रीलंका, लाओस, कंबोडिया आणि बांगलादेश या नऊ प्रमुख आशियाई देशांसह इंडोनेशिया, मलेशिया, अमेरिका, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया आणि भूतान आदी २७ हून अधिक देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

या सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विविध देशांतील बौद्ध संघ आपापल्या मातृभाषेत त्रिपिटकाचे पठण करणार आहेत. भाषांचे वैविध्य असले तरी बुद्धवचनांचा संदेश एकच असल्याचे या माध्यमातून अधोरेखित केले जाणार आहे. 'भाषा अनेक, पण अर्थ एक' या संकल्पनेतून जागतिक शांतता, करुणा, मैत्री आणि बंधुभावाचा संदेश दिला जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय बौद्ध परिक्रमेने सोहळ्याचा प्रारंभ -
२ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता आंतरराष्ट्रीय बौद्ध परिक्रमेला सुरुवात होणार आहे. विविध बौद्ध देशांचे सांस्कृतिक चित्ररथ या परिक्रमेत सहभागी होतील. त्यानंतर ऐतिहासिक महाबोधी महाविहारात अभिधम्म पिटक पठणाचा प्रारंभ होईल. २ ते १२ डिसेंबरदरम्यान दररोज त्रिपिटक पठण, धम्मदेशना आणि विपश्यना ध्यानाचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. देश-विदेशातील वरिष्ठ बौद्ध आचार्य आणि विद्वान या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

२२० सुवर्ण बुद्धमूर्तींचे विविध विहारांना महादान -
या सोहळ्यातील एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे चार फूट उंचीच्या २२० हस्तनिर्मित सुवर्ण बुद्धमूर्तींचे महादान. ओडिशामध्ये तयार करण्यात आलेल्या या बुद्धमूर्ती भारतातील विविध बुद्ध विहार आणि बौद्ध संस्थांना अर्पण केल्या जाणार आहेत. लाईट ऑफ बुद्धधम्मा फाउंडेशन इंटरनॅशनलच्या प्रमुख वांग्मो डिक्सी यांनी याबाबत माहिती दिली.

तसेच कर्नाटकच्या महाबोधी सोसायटीच्या वतीने संपूर्ण महाबोधी महाविहार परिसराची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. कालचक्र मैदानावर सुमारे ३० हजार चौरस फुटांचा भव्य मंच आणि वातानुकूलित मंडप उभारण्यात येत आहे. या ठिकाणी भिक्षुसंघासाठी दररोज दान आणि उपस्थितांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

१३ ते १५ डिसेंबरदरम्यान बौद्ध शांतता व हेरिटेज यात्रा - 
मुख्य सोहळ्यानंतर १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत जेठियन दरी ते राजगीर येथील प्राचीन आम्रवनापर्यंत आंतरराष्ट्रीय बौद्ध शांतता व हेरिटेज यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र पाऊलखुणांशी संबंधित ऐतिहासिक स्थळांना या यात्रेत भेट दिली जाणार आहे. २७ देशांतील एक हजारांहून अधिक मान्यवर या यात्रेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

केंद्र आणि बिहार सरकारचे सहकार्य; अनेक मान्यवर उपस्थित राहणार -
लाईट ऑफ बुद्धधम्मा फाउंडेशन इंटरनॅशनल-इंडिया आणि इंटरनॅशनल त्रिपिटक चँटिंग कौन्सिल-इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील १७ बौद्ध संस्थांच्या सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे आणि बिहार सरकारचे या उपक्रमाला सहकार्य असल्याचे आयोजकांनी सांगितले.

उद्घाटन समारंभाला बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी प्रमुख पाहुणे, तर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ३ ते १२ डिसेंबरदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, किरेन रिजिजू, जीतनराम मांझी आणि रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

बौद्ध पर्यटनाला चालना; २५ कोटींच्या आर्थिक उलाढालीचा अंदाज - 
या आंतरराष्ट्रीय सोहळ्यामुळे भारताच्या बौद्ध सर्किट पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. देश-विदेशातून हजारो बौद्ध अनुयायी आणि पर्यटक बोधगयेत येणार असल्याने स्थानिक पर्यटन, हॉटेल व्यवसाय, वाहतूक आणि अन्य सेवा क्षेत्रांना फायदा होऊ शकतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेत सुमारे २५ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.

'बोधगयातून जगाला शांतता आणि करुणेचा संदेश' -
लाईट ऑफ बुद्धधम्मा फाउंडेशन इंटरनॅशनलच्या संस्थापिका आणि कार्यकारी संचालक वांग्मो डिक्सी यांनी या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “बुद्ध धम्माची मातृभूमी असलेल्या भारतात धम्माचा हा पवित्र ध्वनी पुन्हा आणणे हे परम भाग्य आहे. बोधीवृक्षाखाली होणारे प्रत्येक पठण जगातील सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी आणि शांततेसाठी केलेली सामूहिक प्रार्थना आहे. आज संपूर्ण जग अशांततेतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असताना, बोधगयातून निघणारा करुणा आणि समन्वयाचा जागतिक संदेश मानवतेला नवी दिशा देईल.”

या पत्रकार परिषदेला डॉ. विजय कदम, डॉ. निशा रंगारी आणि सतशील मेश्राम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS