
मुंबई JPN NEWS - कुर्ला पश्चिम येथील प्रमोद महाजन उद्यानात तरुण जोडप्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. उद्यानात जोडप्यांनी बसण्यास हरकत नसली, तरी त्यांनी योग्य वर्तन केले पाहिजे, अशा आशयाचे वक्तव्य महापौरांनी केल्यानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाली. त्यानंतर आता आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगत महापौरांनी स्पष्टीकरण दिले आहे.
२१ नोव्हेंबर रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना कुर्ला उद्यानातील घटनेवर प्रतिक्रिया देताना महापौरांनी उद्यान हे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह येणाऱ्या माता आणि तरुणांसह सर्व नागरिकांसाठी असल्याचे सांगितले होते. जोडप्यांनी उद्यानात बसण्यास काही गैर नसल्याचे सांगतानाच, चुकीचे वर्तन होत असल्यास ते चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. या विधानामुळे मारहाण झालेल्या जोडप्याच्या वर्तनावरच महापौरांनी प्रश्न उपस्थित केला का, असा सवाल उपस्थित होऊ लागला.
कुर्ल्यातील तरुण जोडप्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्याऐवजी त्यांच्या वर्तनाबाबत भाष्य केल्याने महापौरांच्या भूमिकेवर टीका झाली. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना सुरक्षितता देण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना, अशा घटनेत पीडितांच्या वर्तनाचा मुद्दा पुढे आणणे योग्य आहे का, अशी चर्चा सुरू झाली.
वाद वाढल्यानंतर महापौरांनी २४ नोव्हेंबर रोजी स्पष्टीकरण देत आपल्या वक्तव्याचा संदर्भ तोडून चुकीचा अर्थ पसरवला जात असल्याचा दावा केला. पत्रकारांनी उद्यानांमधील गैरप्रकारांबाबत स्वतंत्र प्रश्न विचारला होता आणि त्यावर सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणांची प्रतिष्ठा, शिस्त व चांगले वर्तन राखावे, असे सर्वसाधारण आवाहन केले होते. हे वक्तव्य पीडित जोडप्याला उद्देशून नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.
कुर्ला उद्यानातील हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, हीच आपली पहिल्या दिवसापासूनची भूमिका असल्याचेही महापौरांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणातील अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवले असून, उद्यानांमधील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे आणि गस्त वाढवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
मात्र, मूळ वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद आणि त्यानंतर महापौरांनी दिलेले स्पष्टीकरण यामुळे कुर्ला उद्यानातील मारहाण प्रकरणात नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा आणि सार्वजनिक ठिकाणी तरुण जोडप्यांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.


No comments:
Post a Comment