
मुंबई JPN NEWS - मुंबईच्या पर्यटन वैभवात आणखी एक आकर्षणाची भर पडणार असून, पवई तलाव परिसरात भव्य म्युझिकल फाउंटन आणि लाईट अँड साउंड शो साकारण्यात आला आहे. सुमारे ३० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात १८० मीटर लांबीचे अत्याधुनिक संगीतमय कारंजे उभारण्यात आले असून, त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मराठ्यांचा पराक्रम, महाराष्ट्राची संस्कृती आणि मुंबईची गौरवगाथा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सादर केली जाणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी सायंकाळी ७ वाजता कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे.
पवई तलावातील गणेश घाट परिसरात उभारण्यात आलेला हा म्युझिकल फाउंटन देशातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक कारंजे प्रकल्पांपैकी एक ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पर्यटनाला चालना देणे आणि मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांना एक नवा दृक्-श्राव्य अनुभव उपलब्ध करून देणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
मराठ्यांचा इतिहास आता पाण्याच्या पडद्यावर -
या प्रकल्पांतर्गत म्युझिकल फाउंटन, वॉटर स्क्रीन, फायर जेट्स, लेझर आणि प्रोजेक्शन तंत्रज्ञानाचा वापर करून तीन स्वतंत्र मल्टिमीडिया शो सादर केले जाणार आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या शौर्यगाथा, महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा तसेच मुंबईच्या ऐतिहासिक आणि वैभवशाली प्रवासाचे चित्रण करण्यात येणार आहे.
संगीताच्या तालावर नृत्य करणारे पाण्याचे कारंजे, आगीच्या ज्वाळा, वॉटर स्क्रीनवरील दृश्ये आणि लेझर प्रतिमा यांचा समन्वय प्रेक्षकांसाठी आकर्षक अनुभव निर्माण करणार आहे.
४० मीटर उंच पाण्याचे जेट्स, २७ फायर जेट्स -
म्युझिकल फाउंटनमध्ये अत्याधुनिक डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. या प्रणालीद्वारे सुमारे ४० मीटर म्हणजेच १३० फूट उंचीपर्यंत पाण्याचे जेट्स झेपावणार आहेत. तसेच २७ फायर जेट्स, रनिंग फाउंटन चेसर्स, थ्रीडी स्विंग नॉझल्स आणि फॅन जेट्स यांमुळे पाण्याच्या विविध आकर्षक रचना साकारल्या जाणार आहेत.
संपूर्ण शोचे प्रोग्रामिंग डिजिटल पद्धतीने करण्यात आले असून, संगीत, प्रकाश, पाण्याची उंची, अग्निज्वाळा आणि दृश्य परिणाम यांचा एकत्रित वापर करून भव्य सादरीकरण करण्यात येणार आहे.
तलावातील पाण्याच्या गुणवत्तेलाही फायदा होण्याची अपेक्षा -
म्युझिकल फाउंटनमुळे पवई तलावातील पाण्याचे एरेशन अर्थात पाण्यात हवा मिसळण्याची प्रक्रिया होण्यास मदत होणार आहे. या यंत्रणेद्वारे दररोज सुमारे ३० लाख लिटर पाण्यात हवा मिसळण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय परिसरातील तापमानात घट, बाष्पीभवनामुळे निर्माण होणारा थंडावा आणि हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होण्याचे संभाव्य फायदेही सांगण्यात आले आहेत.
पर्यटन विकास निधीतून ३० कोटींचा प्रकल्प -
मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या पर्यटन स्थळ विकास निधीतून या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी म्हाडाची अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्ती केली. प्रकल्पाचे आराखडे व मांडणी मुंबई महानगरपालिकेकडे सादर करून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आले आहे. म्हाडा, महानगरपालिका आणि कंत्राटदार यांच्यात त्रिपक्षीय कराराद्वारे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
प्रकल्पाच्या संचालनासाठी स्वतंत्र कंट्रोल रूम, सीसीटीव्ही, प्रशिक्षित कर्मचारी, सुरक्षा रक्षक, अग्निशमन उपकरणे, अखंड वीजपुरवठ्यासाठी जनरेटर, प्राथमिक उपचार सुविधा आणि व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज सुमारे तीन तासांच्या कालावधीत तीन शो सादर करण्याचे नियोजन असून, निविदेमध्ये तीन वर्षांची देखभाल-दुरुस्ती आणि प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षांच्या संचालनाची तरतूद करण्यात आली आहे.
जलचरांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी -
पवई तलावातील जलचरांना कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी फाउंटनमध्ये एलईडी दिव्यांचा वापर करण्यात येणार असून प्रकाश पाण्याच्या पृष्ठभागावरून वरच्या दिशेने दिला जाणार आहे. ध्वनीची तीव्रता निर्धारित डेसिबल मर्यादेत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पर्यावरणीय नियमांचे पालन करून जलचरांच्या सुरक्षेची काळजी घेत हा प्रकल्प विकसित करण्यात आल्याची माहिती संबंधित विभागाने दिली.
मुंबईच्या पर्यटनाला नवी ओळख -
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मराठ्यांचा पराक्रम आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा या प्रकल्पामागील उद्देश आहे. पवई तलावाच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालणारा हा म्युझिकल फाउंटन मुंबईच्या पर्यटन विकासाला चालना देईल, पर्यटकांची संख्या वाढवेल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करेल, असा विश्वास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
मुंबईला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण पर्यटन प्रकल्पांची आवश्यकता असून, पवई तलावावरील म्युझिकल फाउंटन हे मुंबईच्या पर्यटन क्षेत्रातील नवे आकर्षण ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


No comments:
Post a Comment