
मुंबई JPN NEWS - पवई तलावाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अत्याधुनिक म्युझिकल फाउंटनच्या माध्यमातून आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मराठ्यांचा शौर्यपूर्ण पराक्रम, महाराष्ट्राची संतपरंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचा भव्य अनुभव मुंबईकरांना घेता येणार आहे. पवई तलावातील गणेश घाटावर उभारण्यात आलेल्या १८० मीटर लांबीच्या ‘लाइट, साउंड अँड म्युझिकल फाउंटन शो’चे उद्घाटन शनिवारी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर झालेल्या पहिल्या शोला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
या शोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि महाराष्ट्राची संस्कृती आधुनिक तंत्रज्ञान, संगीत, प्रकाशयोजना, वॉटर स्क्रीन आणि फायर जेट्सच्या साहाय्याने सादर केली जाणार आहे. इतिहास, मनोरंजन आणि दृक्-श्राव्य तंत्रज्ञानाचा संगम असलेला हा प्रकल्प मुंबईतील पर्यटन आकर्षणांमध्ये नवी भर घालणार आहे.
उद्घाटनप्रसंगी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी, सुमारे १८० मीटर लांबीचा हा अत्याधुनिक म्युझिकल फाउंटन देशातील मोठ्या फाउंटन्सपैकी एक ठरणार असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आणि मराठ्यांच्या शौर्याची गाथा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर मांडली जाणार आहे. मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांनी या शोचा आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. पवई तलावाचे नैसर्गिक सौंदर्य जपण्यासोबतच तलावाच्या स्वच्छतेवरही विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित शोच्या लेखिका शिवानी गोखले, आमदार दिलीप लांडे, स्थानिक रहिवासी संघाचे डॉ. रतन शारदा, नगरसेवक साक्षी दळवी आणि चित्तरंजन शर्मा उपस्थित होते. याशिवाय मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, म्हाडाच्या स्लम बोर्डाचे मुख्य अधिकारी सतीश भारतीय तसेच म्हाडा आणि महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते.
या प्रकल्पात संगीतमय कारंजे, वॉटर स्क्रीन, फायर जेट्स आणि अत्याधुनिक मल्टिमीडिया तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तीन वेगवेगळ्या मल्टिमीडिया चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि मुंबईची गौरवगाथा सादर केली जाणार आहे. पाण्याच्या झोतांसोबत प्रकाश आणि संगीताची सांगड घालून प्रेक्षकांना भव्य दृक्-श्राव्य अनुभव देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
फाउंटनच्या माध्यमातून तलावातील पाण्याचे एरेशन अर्थात हवामिश्रणही केले जाणार आहे. दररोज सुमारे ३० लाख लिटर पाण्यात हवा मिसळण्याच्या प्रक्रियेमुळे पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे तलावाच्या पर्यावरणीय स्थितीत सुधारणा होण्यास हातभार लागेल, असा दावा करण्यात आला आहे. याशिवाय बाष्पीभवनामुळे परिसरात थंडावा निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
पवई तलावाचे नैसर्गिक सौंदर्य, महाराष्ट्राचा इतिहास आणि आधुनिक मनोरंजन यांचा संगम साधणारा हा म्युझिकल फाउंटन मुंबईच्या पर्यटन नकाशावर पवईला नवे आकर्षण मिळवून देण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पासोबत तलावाची स्वच्छता आणि पर्यावरणाचे संरक्षण याकडेही सातत्याने लक्ष दिले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


No comments:
Post a Comment