'मराठी नंबर प्लेट्स'विरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'मराठी नंबर प्लेट्स'विरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू

Share This

'मराठी नंबर प्लेट्स'विरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू
मुंबई : मराठी भाषेतील नंबर प्लेट्स वापरणार्‍या वाहनचालकांवर मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने मंगळवारपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. अशा नंबर प्लेट्सचा वापर दिवसागणिक वाढत चालल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे 'मराठीप्रेम' दाखवणार्‍या वाहनचालकांची चिंता वाढली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमावली, 1989 अन्वये मराठीतील वाहन क्रमांक बेकायदेशीर असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

मुंबई शहरात फॅन्सी नंबर प्लेट्स वापरणार्‍या वाहनचालकांचे प्रमाण अधिक आहे. या विरोधातील मोहिमेंतर्गत पोलिसांनी जानेवारी ते ऑगस्ट या अवधीत एकूण 26,852 वाहनचालकांवर दंडाची कारवाई केली. संबंधितांकडून 28.50 लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. बहुतांश वाहनचालक मराठी नंबर प्लेट्सचा वापर करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले, मात्र केंद्रीय मोटार वाहन नियमावली, 1989 च्या कलम 50 (ड) अन्वये इंग्रजीव्यतिरिक्त अन्य भाषेचा वापर बेकायदेशीर असल्याचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) विश्वास पानधरे यांनी सांगितले. काही वाहनचालक वाहनांच्या क्रमांकाची 'नाना', 'दादा' आणि 'पवार' यासारख्या शब्दांत मांडणी करतात. त्यामुळे वाहनाचा क्रमांक ओळखणे पोलिसांना मुश्किल बनते. वाहनचालकांना जर मराठी नंबर हवा असेल तर नंबर प्लेटच्या जागेशिवाय अन्य ठिकाणी ते तसा नंबर लिहू शकतात, असे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या या विशेष मोहिमेदरम्यान अन्य राज्यांतील नोंदणी क्रमांक असलेल्या वाहनांवरही करडी नजर ठेवली जाणार आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages