‘मँगो बाईट’वर बंदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 October 2012

‘मँगो बाईट’वर बंदी

‘मँगो बाईट’ ही कॅण्डी आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित नाही, असे कारण देऊन राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) या गोळ्य़ांचा बाजारात असलेला सर्व साठा काढून घेण्याचे आदेश पार्ले प्रॉटक्ट्स कंपनीस दिला आहे.


‘एफडीए’च्या कोकण विभागीय अधिकार्‍यांनी अलीकडेच रायगड जिल्ह्यात एका ठिकाणी व भिवंडी येथे दोन ठिकाणी धाडी टाकून तयार ‘मँगो बाईट’ व त्यासाठी लागणार्‍या कच्च्या मालाचा सुमारे दोन कोटी रुपयांचा साठा जप्त केल्यानंतर प्रशासनाचे ठाणे येथील सहआयुक्त (अन्न) एस. के. शेरे यांनी हा आदेश दिला आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार पार्ले बिस्किट्स प्रा. लि. कंपनीच्या खोपोलीजवळील किरखिंडे येथील कारखान्यात ‘बफर्ड लॅक्टिक अँसिड’ हे प्रतिबंधित रसायन ही कॅण्डी तयार करण्यासाठी वापरले जात होते. त्या ठिकाणी जप्त केलेल्या १.४६ कोटी रुपयांच्या मालामध्ये प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये भरून बाजारात पाठविल्या जाणार्‍या ‘कच्चा मँगो बाईट’चाही समावेश होता. याच गोळ्य़ांचा साठा भिवंडी येथील गोदामातूनही हस्तगत केला गेला. याआधी नाशिक येथील एका कारखान्यावर धाड घालून ‘मँगो बाईट’चा ६0 लाखांचा साठा जप्त केला गेला होता. या गोळ्य़ा आता तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात जातील व तेथून अहवाल येईपर्यंत कंपनीने या उत्पादनाचा बाजारातील सर्व साठा मागे घ्यावा, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

लॅक्टीक अँसिड हानिकारक
अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार लॅक्टिक अँसिड आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक व असुरक्षित असले तरी ते मानवी सेवनास अयोग्य म्हणून घोषित केले जाऊ शकत नाही. मात्र या रसायनाचा अन्न पदार्थांमध्ये वापर करण्यास भारतीय अन्न प्राधिकरणाने प्रतिबंध केला आहे. लॅक्टिक अँसिड प्रामुख्याने दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळते. या वस्तूच्या सततच्या व अती सेवनाने दात किडणे व सडण्याचे दुष्परिणाम होतात, असे चांचण्यांमध्ये आढळून आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS