अनधिकृत होर्डिग्सवर कारवाई करण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 October 2012

अनधिकृत होर्डिग्सवर कारवाई करण्याची मागणी

महानायक इफेक्ट 
सोमवारी महानायक मध्ये "होर्डिंगबाबत पालिका हतबल" हा लेख प्रसिद्धा झाला होता 

मुंबई : मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात येणार्‍या अनधिकृत होर्डिग्स, बॅनर्समुळे मुंबई विद्रुप होऊ लागली असून पालिकेचा महसूलही बुडत आहे. त्यामुळे होर्डिग्स, बॅनर्स लावण्यापूर्वी पालिकेची परवानगी घेतलेल्या व त्याप्रमाणे भाडे भरलेल्या पावतीची झेरॉक्स प्रत होर्डिग्स, बॅनर्सवर लावण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक उदेश पाटेकर यांनी विधी समितीत हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे केली. यावर विधी समिती अध्यक्ष राजू पेडणेकर यांनी आठ दिवसांत मुंबईतील अनधिकृत होर्डिग्स, बॅनर्स काढावे, असे आदेश प्रशासनास दिले.

मुंबईत करोडो रुपये खर्चून पालिकेतर्फे मोठमोठी सुशोभित उद्याने बांधली आहेत. तसेच अनेक पर्यटन ठिकाणे आहेत. मुंबईत अनेक देश-विदेशांतून पर्यटक मोठय़ा संख्येने येत असतात, मात्र उद्याने, पर्यटन स्थळे अशा महत्त्वाच्या जागांबरोबरच चौका-चौकात सर्वच राजकीय पक्षांच्या नावाने, नेत्यांच्या वाढदिवसाचे होर्डिग्स, बॅनर्स त्या-त्या विभागातील स्वयंभू नेत्यांकडून लावले जातात. या वेळी पालिकेची परवानगीही घेतली जात नाही. अशा प्रकारे लावण्यात येणार्‍या होर्डिग्स, बॅनर्समुळे या पर्यटन स्थळांचे सौंदर्य बाधित होते. मुंबईत येणार्‍या पर्यटकांना सुंदर मुंबईचे दर्शन घडण्यापेक्षा विद्रुप मुंबईचे दर्शन होते. मुंबईत निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यावर ज्याप्रमाणे प्रशासनाकडून होर्डिग्स, बॅनर्सविरोधात कडक कारवाई केली जाते. त्याचप्रमाणे पालिकेने सलगपणे कारवाई सुरू ठेवली तर या प्रकाराला आळा बसेल, असे पाटेकर यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, मुंबईचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी नगरसेवकांनी तसेच लोकप्रतिनिधींनीही सहकार्य करावे, अशी विनंती आपण करत असून त्याचबरोबर प्रशासनानेही कडक कारवाई करावी, असे अध्यक्षांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS