सहा महिन्यांत तिसर्‍यांदा पेडर रोड खचण्याची घटना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 October 2012

सहा महिन्यांत तिसर्‍यांदा पेडर रोड खचण्याची घटना


मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध पेडर रोडवरील रस्ता पुन्हा पुन्हा खचणे सुरूच आहे. मंगळवारी पेडर रोडवर असणार्‍या कॅडबरी हाऊसजवळ रस्ता खचण्याची घटना घडली. दुपारी 1 वाजता पेडर रोडवर अचानक रस्ता खचून पाच फुटांचा खड्डा पडला. त्यामुळे हाजीअलीच्या दिशेने जाणारी वाहतूक नाना चौक ताडदेवमार्गे वळवण्यात आली.

दुपारी रस्ता खचल्यानंतर रात्री उशिरा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. पेडर रोडखाली ब्रिटिशकालीन मलनि:सारण वाहिन्या असल्यामुळे व त्या अतिशय जीर्ण झाल्या असल्याने त्या वाहिन्यांतून काही ठिकाणी गळती होत होती. त्यामुळे पाणी झिरपून रस्त्यावरील माती धसून रस्ता खचण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे पालिका अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

पेडर रोडच्या खाली असणार्‍या जीर्ण वाहिन्या बदलण्याचे काम महापालिका त्वरित हाती घेणार आहे; परंतु या कामासाठी किमान दोन दिवस येथील ट्राफिक बंद ठेवण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रस्तावित असलेल्या पेडर रोडवरील उड्डाणपुलाच्या कामासाठी राज्य सरकार जोपर्यंत अंतिम मंजुरी देत नाही तोपर्यंत पालिकेला मलनि:सारण वाहिन्या बदलण्याचे काम हाती घेणे अशक्य आहे, मात्र प्रस्तावित पुलाच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर मलनि:सारण वाहिन्या कशा बदलायच्या, हे ठरवणे पालिकेला शक्य आहे, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS