शिवसेनाप्रमुखांचे स्मारक / नवीन वाद निर्माण करण्याचा मनसेचा प्रयत्न - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 November 2012

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक / नवीन वाद निर्माण करण्याचा मनसेचा प्रयत्न


शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शिवाजी पार्कऐवजी इंदू मिलमध्ये व्हावे - मनसे
नवीन वाद निर्माण करण्याचा मनसेचा प्रयत्न
आंबेडकरी जनतेत  मनसे विरोधात तीव्र नाराजी
मुंबई / अजेयकुमार जाधव 

दादर येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी आंबेडकरी जनता व संघटना प्रयत्नात असून राज्य व केंद्र  सरकार कडून आंबेडकर यांच्या स्मारका बाबत अंतिम प्रक्रिया सुरु असतानाच मनसेने इंदू मिलच्या अर्ध्या जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व्हावे अशी मागणी करून नवा वाद निर्माण करण्यास सुरुवात केली असल्याने आंबेडकरी जनतेत मनसे विरोधात तीव्र नाराजी पसरली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्कवरच स्मारक उभे करण्याची इच्छा ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी व्यक्‍त केली. शिवसेनाप्रमुखांचे भव्य स्मारक व्हायला हवे. परंतु शिवाजी पार्कमध्ये होऊ नये. स्मारक शिवाजी पार्कऐवजी इंदू मिलमध्ये व्हावे, असे मत मनसेचे दादरमधील नगरसेवक संदीप देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.

बाळासाहेबांवर अग्निसंस्कार झाले तेथे मंडप बांधून अतिक्रमण करण्यात येत आहे. खरे तर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक इंदू मिलमध्ये व्हायला हवे. इंदू मिलची जी जागा मागितली जात आहे. त्यातील अर्धी जागा शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला दिली पाहिजे. ही जागा खूप मोठी आहे. तेथे भव्य स्मारक उभारता येईल, असे देशपांडे म्हणाले. इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्याची मागणी डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांकडून वर्षभरापासून होत आहे. अनेक संघटनांनी मिलची संपूर्ण जागा डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्याची मागणी लावून धरली असताना आता मनसेने ही नवीच मागणी केली आहे. 

प्रस्ताव आल्यास सरकार स्मारकाबाबत सकारात्मक विचार करील, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी सोमवारी दिले आहेत. शिवाजी पार्क ही स्मशानभूमी नसतानाही सरकारने विशेष बाब म्हणून तेथे अंत्यविधीची परवानगी दिली. कारण शिवाजी पार्क आणि बाळासाहेब हे अतूूट नाते आहे. त्यामुळेच त्यांच्या स्मारकाबाबत काही प्रस्ताव आल्यास सकारात्मक विचार होईल, असे जाधव यांनी सांगितले. मात्र अद्याप प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्ट करून परवानगी देताना कायदेशीर बाजूही तपासून घेऊ, असे ते म्हणाले. 
 
शिवाजी पार्क हे खेळासाठीचे मैदान असून ते इतर कार्यक्रमांसाठी देण्यात येऊ नये, अशा मागणीची याचिका रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे. त्यामुळे राज्य सरकार त्याबाबत लगेच निर्णय घेऊ शकत नाही, असे विधी व न्याय विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. मुंबई महापालिकेने हे मैदान सार्वजनिक असल्याची भूमिका न्यायालयात घेतली आहे. खेळासाठीच्या मैदानात बांधकामाला परवानगी मिळत नसली तरी सार्वजनिक मैदानामध्ये बांधकामाला परवानगी मिळू शकते. पण अद्याप न्यायालयाने त्याबाबत निकाल दिलेला नसल्याचे त्या अधिकार्‍याने सांगितले.
 
मैदानावर स्मारक नको 
शिवाजी पार्क रहिवाशांची संघटना ‘व्हॅकॉम’चे अध्यक्ष अशोक रावत यांनी स्मारकाला विरोध केला आहे. हे मैदान खेळाचे असून तेथे स्मारक वा पुतळा उभारणीस रहिवाशांचा विरोध असल्याचे ते म्हणाले. मैदानात शिवरायांचा पुतळा आहे. दुसरा पुतळा उभारू नये असे रावत म्हणाले. तसेच मुंबई पुरातन वास्तू जतन समितीने (हेरिटेज) शिवाजी पार्कला दिलेल्या "अ" ग्रेड दर्जामुळे येथे कोणतेही नवे बांधकाम करता येत नाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS