20 आमदार व 2 खासदारांवर अपात्रतेची तलवार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 December 2012

20 आमदार व 2 खासदारांवर अपात्रतेची तलवार


मुंबई : आमदार, खासदार, मंत्री यांनी पदावर असताना इतर ठिकाणी लाभाची पदे घेऊ नयेत, असे संकेत असतानाही 20 आमदार आणि दोन खासदारांनी लाभाची पदे घेतली असून त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार लटकत आहे. या 20 आमदारांपैकी बहुसंख्य आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत. 

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल लोके यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीवरून ही बाब स्पष्ट झाली असून लोके यांनी शुक्रवारी प्रेस क्लब आणि पत्रकार संघ या दोन ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन ही माहिती उघड केली आहे. याबाबत लोके यांनी सांगितले की, 25 जुलै 2012 रोजी संविधानातील अनुच्छेद 191 (1) (ए)/(क) नुसार सरकारच्या अधीन लाभाचे पद धारण केल्यामुळे लोकप्रतिनिधींना अपात्र ठरविण्याबाबत राज्यपालांना पत्र पाठविले होते. मात्र याबाबत राज्यपालांनी कोणतेही उत्तर दिले नाही. या प्रकरणी राज्यपालांनी निवडणूक आयोगाचे मत घेणे अपेक्षित होते, परंतु तसे न करता त्यांनी विधी आणि न्याय विभागाचे मत घेतले आहे, असेही लोके यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी लोके यांनी आता राष्ट्रपतींकडे पत्रव्यवहार केला आहे. या मुद्यावर निवडणूक आयोगाचे मत घेतल्यास 20 आमदार आणि दोन खासदार अपात्र ठरणार आहेत. यात काही माजी आमदारांचाही समावेश आहे. मात्र हे आमदार आणि खासदार कोण आहेत, असा प्रश्न विचारल्यानंतर, यासंदर्भात माहिती अधिकाराखाली 80 टक्के माहिती हाती आली असून उर्वरित 20 टक्के माहिती हाती आल्यानंतर आपण येत्या जानेवारी महिन्यामध्ये याचा गौप्यस्फोट करू, असा दावा लोके यांनी केला आहे.

यापूर्वी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचाही कशा प्रकारे दुरुपयोग होतो तसेच त्याद्वारे मनमानी कारभार कसा करता येतो, हे लोके यांनी उघडकीस आणले होते. लोक हे माहिती अधिकाराबरोबरच तंत्रज्ञान क्षेत्रातीलही तज्ज्ञ आहेत. त्यामुळेच त्यांनी व्होटिंग मशीनमार्फत होत असलेला गैरकारभार उघडकीस आणला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS