मुंबई- दादर येथील शिवाजी पार्कचे नाव ‘शिवतीर्थ’ करण्याचा ठराव अंगलट येत असल्याचे दिसू लागताच नामांतराचा मुद्दा म्यान करत शिवसेना नेत्यांनी आपल्या भूमिकेपासून घूमजाव केल्याचे बुधवारी उघड झाले. बहुमताची अडचण, कायद्याचा खो आणि नगरविकास खात्याची मंजुरी अशा अनेक अडचणी दिसू लागल्याने ‘मैदानाला नव्हे, तर चौथ-याला शिवतीर्थ नाव द्या’ अशी नवी भूमिका आता शिवसेनेने घेतली आहे. त्यासाठी नव्याने प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई पालिकेवर महायुतीची सत्ता आहे. महापौर आणि स्थायी समिती ही महत्त्वाची पदे शिवसेनेकडे आहेत. शिवाजी पार्कवरील चौथ-याच्या वाद शमलेला नसतानाच स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी ‘शिवतीर्थ’चा मुद्दा पुढे केला. शेवाळे यांची नामांतराची ठरावाची सूचना दाखल होताच पालिकेतील विरोधी पक्ष एकवटले आणि त्यांनी नामांतराचा ठराव हाणून पाडायचे ठरवले.
शिवाजी पार्कच्या नामांतराला सभागृहात आणि रस्त्यावर विरोध करु, असा काँग्रेस आणि मनसेने इशारा दिला. विशेष म्हणजे मित्रपक्ष भाजपनेही नामांतराबाबत अजूनही भूमिका उघड केलेली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. सभागृहातील बहुमताची अडचण समोर असतानाच नामांतराला पूर्वीच्या एका ठरावाचाही अडसर आहे. केवळ परकीय व्यक्तींची नावे असतील तरच एखाद्या वास्तूची किंवा मैदानांचे नामांतर करता येईल, अशी तरतूद महापालिका अधिनियमात शिवसेनेची सत्ता असतानाच करण्यात आलेली आहे, त्यामुळे नामांतरात अडचणी येण्याची चिन्हे आहेत.


No comments:
Post a Comment