‘ड्राईव्ह अगेन्स्ट डायबिटीस’ चा शुभारंभ, उद्या संपूर्ण मुंबईत तपासणी मोहीम
संपूर्ण मुंबईभर एकाचवेळी सुमारे २ लाख नागरिकांची मधुमेह तपासणी करण्याचा उपक्रम हाती घेऊन करण्यात आलेला संकल्प यशस्वी होण्यासाठी मुंबईकरांनी त्यास प्रतिसाद द्यावा तसेच मधुमेह विरोधातील लढ्यात महापालिकेच्या प्रयत्नांना खासगी रुग्णालये आणि सामाजिक संस्थांनीही बळकटी द्यावी, असे आवाहन मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांनी केले आहे.नरिमन पॉईट येथील हॉटेल ट्रायडंटमध्ये आयोजित केलेल्या शुभारंभ कार्यक्रमात मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांच्या हस्ते नरिमन पॉईट चौपाटीवर आकाशात निळे फुगे सोडून ‘ड्राईव्ह अगेन्स्ट डायबिटीस’ या उपक्रमाचा शुभारंभ आज (दिनांक १२ नोव्हेंबर, २०१३) दुपारी करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
बृहन्मुंबई महापालिका व कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांनी संयुक्तिक आयोजित केलेल्या शुभारंभ कार्यक्रमास अबॉट डायबिटीस केअर, जॉन्सन ऍण्ड जॉन्सन मेडिकल इंडिया, अपोलो म्युनिक, सनोफी इंडिया यांचेही सहकार्य मिळाले आहे. जागतिक मधुमेह दिन निमित्ताने उद्या, बुधवार, दिनांक १३ नोव्हेंबर, २०१३ रोजी संपूर्ण मुंबईत सुमारे ५०० अधिक ठिकाणी मुंबईकर नागरिकांची मधुमेह तपासणी केली जाणार आहे. जवळपास २ लाखाहून अधिक नागरिकांची या मोहिमेत तपासणी करण्याचे उद्दिष्ट असून सार्वजनिक - खासगी उपक्रमातून भारतात प्रथमच असा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमातून मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशात मधुमेह या रोगाविषयी जनजागृती करण्याचे मुख्य लक्ष्य आहे.
या उपक्रमाच्या शुभारंभाची माहिती देण्यासाठी हॉटेल ट्रायडंट येथे पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यावेळी बोलताना महापौर प्रभु यांनी सांगितले की, नियोजित मधुमेह तपासणी मोहिमेत सुमारे २ लाख नागरिकांचे उद्दिष्ट्य साध्य झाले तर त्यातून साधारणतः १० ते १२ हजार संभाव्य रुग्ण समोर येतील, असा अंदाज आहे. पुढील वर्षी ५ लाख नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. तथापि, तपासणीची संख्या वाढली तरी संभाव्य रुग्णांची संख्या कमी होणे आवश्यक आहे. तेव्हाच या उपक्रमाचे आणि मधुमेह लढ्याचे उद्दिष्ट साध्य झाले असे म्हणता येईल, असे महापौरांनी नमूद केले.
बृहन्मुंबई महापालिका मुंबईकरांच्या आरोग्य समस्या सोडविण्यासाठी झटत आहे. मधुमेह विरोधातील उपाययोजना यशस्वी करण्यासाठी महापालिकेचे डॉक्टर्स, सहकारी वैद्यकीय मंडळी प्रयत्न करित आहेत. खासगी रुग्णालये आणि सामाजिक संस्थांनी त्यास हातभार लावावा, त्यामुळे महापालिकेचा उत्साह वाढेल, असे सांगून मधुमेह तपासणी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन महापौर प्रभु यांनी समस्त मुंबईकरांना केले.
उद्या नियोजित मधुमेह तपासणी मोहिमेप्रसंगी महापालिकेच्या ५५ डायबिटीक क्लिनिकपैकी काही ठिकाणी महापौर प्रभु हे स्वतः भेट देऊन पाहणी करणार आहेत. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) मनीषा म्हैसकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अनेक नागरिकांना आपणास मधुमेह आहे हे प्रारंभी लक्षात येत नाही. महापालिकेच्या ५५ डायबिटीक क्लिनिक आणि २० रुग्णालयातून मधुमेही रुग्णांना जीवनभर विनामूल्य उपचार पुरविले जातात. महापालिकेकडे सुमारे ८२ हजार मधुमेही रुग्णांचा तपशील तयार आहे. संसर्गजन्य आजारांपेक्षाही मधुमेहासारखे असंसर्गजन्य आजार वेगाने फैलावत असून त्याबाबत जनजागृती करण्यासाठी अभिनव अशा उपक्रमासाठी मुंबईची निवड करण्यात आली आहे.


No comments:
Post a Comment