१६५0 मुले परतली माता-पित्याच्या कुशीत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 January 2014

१६५0 मुले परतली माता-पित्याच्या कुशीत

मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वेमध्ये अनेक लहान मुले भीक मागताना, काही तरी वस्तू विकत असताना, रेल्वे परिसरात फिरताना दिसतात. अशी ही लहान मुले राज्यातील वेगवेगळ्या भागातून तसेच देशातील विविध कोपर्‍यातून येतात. या लहान मुलांना शोधून, पकडून त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे परत पाठवण्याचे काम जीआरपी पोलीस करतात. जानेवारी ते नोव्हेंबर २0१३ या ११ महिन्यांच्या कालावधीत १ हजार ६५0 अल्पवयीन मुलांना रेल्वे पोलिसांनी पकडले असून त्यापैकी १ हजार ४९३ मुलांना त्यांच्या कुटुबांकडे सुपूर्द केले आहे. त्यामध्ये ४६५ मुलींचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे वाशी रेल्वे स्थानकात सर्वात जास्त मुले सापडलेली आहेत.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपर्‍यातून अनेक मुले मुंबईत दाखल होतात आणि रेल्वे परिसरातच राहतात. अनेक मुले परीक्षेत नापास झाल्यामुळे, आई-बाबा ओरडल्यामुळे, चोरी केल्यामुळे, अशा अनेक कारणांमुळे घरातून पळून येत असल्याची माहिती रेल्वे पोलीस देतात. दररोज सुमारे ५ लहान मुले मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांत येतात. मुंबईत १७ रेल्वे पोलीस स्थानके आहेत. ३0 नोव्हेंबर २0१३ पर्यंत रेल्वे पोलिसांनी १ हजार ६५0 लहान मुलांना पकडले आहे. त्यामध्ये १ हजार १४५ मुले, तर ४६५ मुलींचा समावेश आहे. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईतील सहा रेल्वे स्थानकांवर यातील ५0 टक्के मुले सापडलेली आहेत. त्यामध्ये हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकाचा सर्वात पहिला क्रमांक आहे. घरातून पळून आलेल्या या लहान मुलांना पकडून त्यांच्या घरी परत पाठवण्याचे काम जीआरपी करते. १ हजार ६५0 मुलांपैकी १ हजार ६७ मुलांना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आले आहे. त्यामध्ये ७९८ मुलांचा, तर २६९ मुलींचा समावेश आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ४२६ मुलांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये २५0 मुले, तर १७६ मुलींचा समावेश आहे. 

तसेच आजही १५७ मुलांनी बाल सुधारगृहामध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये ९७ मुलांचा आणि ६0 मुलींचा समावेश आहे. या मुलांमध्ये १0 ते १५ वर्ष वयोगटातील मुलांची समावेश असतो. या वयोगटातील मुलांना योग्य काय किंवा अयोग्य काय याची समज नसल्यामुळे ही मुले घरातून पळून येत असल्याचे रेल्वे पोलीस सांगतात.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS