- इंदु मिलच्या भिंतीशेजारी कोनशिला ठेवत उरकले आंदोलन
-भूमीपूजनासाठी आठवलेंनी दिला 26 जानेवारीचा इशारा मुंबई - प्रतिनिधी - 6 / 12 / 2013 - http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website)
बाबासाहेबांच्या स्मारकाची 5 डिसेंबरपूर्वी वीट न रचल्यास महापरिनिर्वाण दिनी भिमसैनिक इंदु मिलमध्ये घुसून भूमीपूजन करतील, अशी धमकी देत रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी राळ उडवून दिली होती. परंतु, प्रचंड पोलीस बंदोबस्तासमोर आठवले यांनी नमते घेत शुक्रवारी मिल कंपाऊंडशेजारी प्रतिकात्मक पूजन करत आंदोलन उरकले.
इंदु मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या श्रेयासाठी अनेकजण धडपडत आहेत. त्यामध्ये रिपब्लिकन सेनेचे आंनदराज आंबेडकर आणि ‘रिपाइं’चे रामदास आठवले अग्रभागी आहेत. 5 डिसेंबरपूर्वी स्मारकाचे भूमीपूजन करण्यात यावे. नाहीतर, भीमसैनिक 6 डिसेंबरला भूमीपूजन करतील, असा इशारा आठवले यांनी दिला होता.
हा इशारा शासनाने गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे आठवले यांची आज पंचाईत झाली. शंभर एक कार्यकर्त्यांसह आठवले 11 वाजता इंदु मिलकडे आले. परंतु, पोलिसांनी त्यांना मिलपासून दूरवर अडवले.
इंदु मिलसमोर असा फौजफाटा होता, की पाहणाºयाची छाती दडपून जावी. त्यामुळे आठवले यांनी अचानक घुमजाव करत प्रतिकात्मक भूमीपूजनाचा निर्णय घेतला. सोबत आणलेली कडाप्पाची कोनशीला मिल कंपाऊंडलगत ठेवली. त्यासोबत छायाचित्रे काढून घेतली आणि भूमीपूजन झाल्याचे जाहीर केले.
रिपाइं'चे कार्यकर्ते गुरुवारी रात्री मिलमध्ये घुसले होते. त्यांनी रात्रीच भूमीपूजन केले आहे. तसेच आता प्रतिकात्मक भूमीपूजनही पार पडले आहे. शासनाने 26 जानेवारीपूर्वी स्मारकाची कोनशिला बसवावी. अन्यथा, राज्यभर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आठवले यांनी यावेळी केलेल्या भाषणात दिला.
विशेष म्हणजे इंदु मिलच्या एका गल्लीत ‘रिपाइं’चे आंदोलन चालू होते. परंतु, पोलिस आणि माध्यमे वगळता गावोगावाहून आलेल्या इतर भिमसैनिकांनी ‘रिपाइं’च्या आंदोलनाकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे ‘रिपाइं’च्या आंदोलनाची हवाच निघून गेली.
गोळ्या झेलू पण मिलमध्ये घुसू, असे आठवले यांनी आव्हान दिले होते. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनावर आंदोलनाचे सावट होते. इंदु मिल परिसराला आज पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. माध्यमाच्या प्रतिनिधींनी सकाळपासून मिलसमोर डेरा टाकला होता. परंतु, प्रतिकात्मक आंदोलनामुळे ‘खोदा पहाड, निकला चुहा’ अशी या उत्सुकता असलेल्या आंदोलनाची गत झाली.


No comments:
Post a Comment