20/12/2013 - http://jpnnews.webs.com
स्वतंत्र नागरी परिवहन निधीमध्ये १00 कोटी रुपयांपर्यंत वाढ
|
बेस्ट उपक्रमाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाबाबत महापालिकेच्या स्थायी समितीची विशेष अर्थसंकल्पीय सभा गुरुवारी स्थायी समिती सभागृहात पार पडली. केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियान योजनेअंतर्गत बेस्ट उपक्रमाच्या सुधारणांसाठी शहर पातळीवर स्वतंत्र नागरी परिवहन निधी स्थायी समिती/महापालिकेचा अनुक्रमे ठरावान्वये विशेष निधी म्हणून निर्माण करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम १२१ अन्वये त्यास मंजुरी मिळाली आहे. या निधीमध्ये दरवर्षी महापालिका ५0 लाख रुपये तरतूद करून बेस्ट उपक्रमास अंशदान करत असते. या तरतुदीमध्ये ५0 लाखांऐवजी १00 कोटी रुपये तरतूद करण्याची शिफारस स्थायी समितीने महापालिकेला केली आहे.मुंबई महापालिकेने बेस्ट उपक्रमाला दरवर्षी ५0 कोटी रुपये अर्थसहाय्य प्रदान करावे, असे शेवाळे म्हणाले. मुंबईत येणार्या कच्च्या खनिज तेलावर आकारण्यात येणार्या जकात करामध्ये 0.२५ टक्के इतकी वाढ करावी, आजघडीला यामुळे अतिरिक्त सुमारे २00 कोटी रुपये महसूल महापालिकेकडे उपलब्ध होऊ शकेल. या 0.२५ टक्के वाढीमुळे मिळणारा अतिरिक्त महसूल बेस्टला प्रदान करावा, अशी शिफारसदेखील त्यांनी केली आहे. या तीन शिफारशींमुळे बेस्ट उपक्रमाला साधारणत: ३५0 कोटी रुपये अर्थसहाय्य मिळू शकेल आणि त्याचा बेस्टला लाभ होईल, असे शेवाळे म्हणाले.१00 वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या इतिहासात प्रथमच महापालिकेच्या स्थायी समितीने अशारीतीने विशेषाधिकाराचा उपयोग करून अर्थसहाय्य प्रदान करण्याची शिफारस केली असून ही ऐतिहासिक बाब असल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी म्हटले आहे.


No comments:
Post a Comment