एसटीमध्ये होणार चालकांची भरती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 December 2013

एसटीमध्ये होणार चालकांची भरती

17/12/2013- http://jpnnews.webs.com
मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील प्रवाशांना चांगली सेवा देणारे एसटी महामंडळ पुन्हा चालकांची भरती करणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या भरतीमध्ये मुंबई प्रदेशसाठी चालक मिळाले नसल्यामुळे पुन्हा एकदा फक्त मुंबई विभागासाठी १५00 चालकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई आणि कोकणातील अनेक बेरोजगार तरुणांना एसटीमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

एसटी महामंडळाकडे आजच्या घडीला एकूण १८ हजार बसेस आहेत. महामंडळामध्ये सध्या सुमारे ३५ हजार चालक आहेत. गेल्या वर्षी महामंडळात झालेल्या भरतीमध्ये ८९४८ चालकांची भरती करण्यात येणार होती. परंतु या भरतीमध्ये मुंबई प्रदेशला आवश्यक असणारे चालक मात्र महामंडळाला मिळाले नाहीत. या भागातून आवश्यक भरतीतून केवळ ३२ टक्केच चालक उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मुंबई आणि कोकणात एसटीमध्ये चालकांची वानवा निर्माण झाली आहे. मुंबई प्रदेशात मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा भाग येतो. त्यामुळे या भागातून १५00 जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार एप्रिल २0१३ मध्ये भरती प्रक्रिया पूर्ण झाली. या भरतीमध्ये ८९४८ चालकांची भरती केली जाणार होती. या भरतीमध्ये ८९४८ पदांपैकी फक्त ५५२४ चालक मिळाले आहेत. तर मुंबई, कोकणाला आवश्यक असणार्‍या २0८0 उमेदवारांपैकी फक्त ६४८ उमेदवारच मिळाले त्यामुळे मुंबई प्रदेशसाठी पुन्हा भरती प्रक्रिया राबविण्याची योजना महामंडळाने आखली आहे. ही भरती ऑनलाईन होणार असून 'सिगमा' ही कंपनी भरती प्रक्रिया राबवणार आहे. राज्यातील कोणत्याही भागातून उमेदवार चालकाच्या पदासाठी अर्ज करू शकतो, परंतु ही भरती प्रक्रिया फक्त मुंबई प्रदेशसाठी असल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना फक्त मुंबई प्रदेशसाठीच नियुक्त करण्यात येणार असल्याचे एसटीतील एका अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे आपला अर्ज सादर करीत असताना उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे एसटीतील एका अधिकार्‍याने सांगितले. या भरतीमध्ये मिळणार्‍या जादा चालकांमुळे एसटीमध्ये दिली जाणारी ओव्हरटाईम ड्युटी दिली जाणार नाही, चालकांना पुरेसा आराम मिळू शकेल, असा विश्‍वास एसटीतील अधिकारी व्यक्त करीत आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS