बजेटबाबत पालिकेला जाब विचारायला चला…. - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 January 2014

बजेटबाबत पालिकेला जाब विचारायला चला….

19/1/2014
मुंबई महानगर पालिकेकडून सन २०१२ - १३ मध्ये जाहीर केलेल्या बजेट मधील विकासकामां साठीचा भांडवली खर्च ३० टक्क्यांनी कमी झाला होता. नगरसेवक निधी आणि वॉर्ड पातळीवरील विकास निधी असा सुमारे ५० टक्के निधी खर्चच झालेला नाही. त्यातच कोणतेही मोठे प्रकल्प हाती न घेतल्यामुळे २०१२ - १३ या आर्थिक वर्षात मुंबई मधील विकास कामांचे सुमारे पाच हजार कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत असेच पडून राहिले होते. 

पालिकेने २०१३ -१४ या आर्थिक वर्षासाठी २७ हजार ५८० कोटी रुपयांचे बजेट जाहीर केले आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षण, साफसफाई इत्यादी मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी २०१२-१३ सालच्या अर्थसंकल्पात ६१४३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षण, साफसफाई इत्यादी मूलभूत सोयी सुविधांसाठी फक्त १0७९ कोटी रुपये एवढीच रक्कम खर्च म्हणजे फक्त १७ टक्केच रक्कम खर्च झाली असून ८३ टक्के रक्कम मनपाच्या तिजोरीत पडून आहे. 

मुंबईतील उद्यानांसाठी मनपाने २२८.५0 कोटींचा तरतूद केली, मात्र उद्यानांसाठी अवघ्या १४ कोटींचा खर्च झाला आहे. भांडवली कामावर २२ हजार ५८४ कोटी खर्च करायचे होते. त्यापैकी ६६८१ कोटी रुपये खर्च झाले आहेत, म्हणजे यावर्षी २९ टक्के खर्च विविध कामांसाठी केला. गेल्या वर्षी २७ टक्के खर्च झाला. आरोग्यासाठी ६५९ कोटींची तरतूद होती, त्यापैकी १४0 कोटींची कामे झाली आहेत. शिक्षणासाठी ३५६ कोटींची तरतूद झाली त्यापैकी ७९.२२ कोटींची कामे झाली. स्ट्रॉर्मवॉटरसाठी २६ टक्के खर्च झाला, तर पाण्यासाठी १७ टक्के खर्च झाला आहे.

पालिकेने सन २००९ - १० पासून पात्र महिलांसाठी स्वयंरोजगार, स्वसंरक्षण, कौशल्य दर्जोन्नातीसाठी प्रशिक्षण, क्षमता वाढी साठी कार्यशाळा प्रशिक्षण, अपंग व्यक्तींना स्वयंरोजगार, वैद्यकीय सहाय्य मदत, आधार प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम, बचत गटांसाठी रीवोल्विंग फंड, राजकीय प्रतिनिधी आणि युपीईसीच्या अधिकाऱ्यांसाठी अभ्यासदौरा यासाठी जेंडर बजेटच्या नावाने करोडो रुपयांची आर्थिक तरतूद करण्यास सुरुवात केली आहे. 

पालिकेने सन २००९-१० साठी ६.५ करोड, २०१०-११ साठी ११. ९५ करोड, २०११-१२साठी १४.६९ करोड,२०१२-१३ साठी १५.४५ करोड, २०१३-१४साठी १९.५० करोड रुपयांची बजेट मध्ये आर्थिक तरतूद केली होती. यापैकी सन २०१०-११ मध्ये फक्त १४.९ लाख रुपये, २०११-१२मध्ये ६१ लाख रुपये, २०१२-१३ मध्ये ३ करोड ६० लाख रुपयेच खर्च झाले आहेत तर शिल्लक राहिलेला निधी खर्चच झाला नसल्याने लॅप्स झालेला (वाया गेलेला) आहे.

२०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपायला आले तरी जेंडर बजेट मधील अद्याप १ कोटी ५० लाख रुपये रीवोल्विंग फंड खर्च झाला आहे, मायक्रो फायनान्स म्हणून दिला जाणारया निधी पैकी फक्त २ कोटी ५० लाख रुपये खर्च होण्याची व सामुग्रीसाठी ५ करोड रुपये रुपये खर्च होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे या वर्षीही जेंडर बजेटच्या नावाने तरतूद केलेला करोडो रुपयांचा निधी लॅप्स होणार आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या वतीने मुंबईच्या विकासासाठी बजेट मध्ये तरतूद केलेला निधी खर्चच होत नसल्याने मुंबईचा हवा तसा विकास होत नसल्याचे दिसत आहे. एकीकडे मुंबईचा विकास निधी खर्च केलाच जात नसल्याने थांबला असताना महिलांच्या रोजगारासाठी, प्रशिक्षणासाठी पालिकेने तरतूद केलेला निधी खर्चच होत नसल्याने (लॅप्स) पालिकेकडून बजेटच्या नावाने मुंबईकरांची फसवणूक केली जात आहे असेच म्हणावे लागेल. 

पालिकेकडून मुंबईकर आणि महिलांची फसवणूक केली जात असतानाच मुंबई महानगर पालिकेमध्ये संविधानाच्या अनुसूची १२ मध्ये महानगर पालिकेच्या जबाबदाऱ्या दर्शविल्याप्रमाणे मुंबई महानगर पालिकेमध्ये सामाजिक न्याय विभाग सुरु करावा. दलित, अल्पसंख्याक, उपेक्षित यांच्यासाठी २५ टक्के बजेट मध्ये राखीव निधीची तरतूद करावी. गेट वे ऑफ इंडिया येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व संविधानाची उद्देशिका उभारावी इत्यादी मागण्यांसाठी या आठवड्यात प्रजासत्ताक भारत या संघटनेच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानात २३ जानेवारी २०१४ रोजी दुपारी ३ वाजता आंदोलन केले जाणार आहे. यावेळी मुंबईचे महापौर सुनील प्रभू आणि आयुक्त सीताराम कुंटे यांना निवेदन देवून बजेटची अंमलबजावणी करण्याची मागणी केली जाणार आहे. 

पालिकेकडून मुंबईकरांकडून कर रूपाने वसूल केलेला निधी बजेट मध्ये तरतूद करूनही मुंबईच्या विकासासाठी खर्चच केला जात नसल्याने, जेंडर बजेटच्या नावाने उपलब्ध केलेला निधी महिला, अपंग व बालकांच्या विकसावर खर्च होत नसल्याने, दलित अल्पसंख्याक यांना संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे पालिका निधीची तरतूद करत नसल्याने पालिकेला प्रत्तेकाने जाब विचारायची गरज आहे. या आठवड्यात २३ जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनात प्रत्तेक महिला, दलित, अल्पसंख्याक व्यक्ती आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संघटनेने सहभागी होऊन पालिकेला आमचे हक्काचे बजेट कुठे आहे, आमच्या हक्काच्या बजेटचे पैसे खर्च का होत नाहीत याचा जाब विचारण्याची गरज आहे.     

अजेयकुमार जाधव 
मो. ९९६९१९१३६३ 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS