ढसाळ यांना सर्वपक्षीय नगरसेवकांची श्रद्धांजली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 January 2014

ढसाळ यांना सर्वपक्षीय नगरसेवकांची श्रद्धांजली

18/1/2014
मुंबई : दलित पँथरचे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक, विद्रोही कवी, बंडखोर नेते नामदेव ढसाळ यांना शुक्रवारी महापालिका सभागृहात महापौरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी श्रद्धांजली वाहून पालिकेची सभा तहकूब केली. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने नामदेव ढसाळ यांच्या नावाने मुंबईत मोठे भवन व त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा तसेच त्यांच्या साहित्यासाठी कलादालन उभारावे व नवोदित कवींना पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी या वेळी अपक्ष नगरसेवक मनोज संसारे यांनी केली. पालिका सभागृहात शुक्रवारी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

प्रस्थापितांच्या मराठी साहित्याला हादरा देणारे, जाती व्यवस्थेच्या विरोधात सत्तरच्या दशकात लढाऊ संघटना उभारून दलितांच्या मानव मुक्तीच्या लढय़ाला आगळे वेगळे परिणाम देणारे मराठी दलित साहित्यामध्ये परिवर्तन घडवणारे असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व हरपल्याचे सभागृह नेते यशोधर फणसे यांनी श्रद्धांजली वाहताना स्पष्ट केले. साहित्य जगताला त्यांचा कविता संग्रह नव्या शब्दकलेचे, नव्या अनुभवाचे दर्शन घडवणारे होते. ढसाळ यांच्या निधनामुळे दलित चळवळीशी बांधिलकी ठेवणार्‍या परिवर्तनशील साहित्यिक, सिद्धहस्त लेखक, महाकवी, कादंबरीकार व लोकनेत्यास आपला देश मुकला, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी व्यक्त केली. 

ढसाळ यांच्या निधनाने दलित साहित्यात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मत मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली, तर ढसाळ यांची माहिती मुंबई मनपाच्या शाळेतून विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी पालिकेने प्रयत्न करावा, अशी मागणी मनसेचे नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी केली. या वेळी सभागृहात भाषण करताना अपक्ष नगरसेवक मनोज संसारे म्हणाले की, संत तुकारामानंतर जर कोणता विद्रोही कवी झाला असेल तर ते नामदेव ढसाळ. साहित्य अकादमी, पद्मश्री आदी विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले, मात्र हा कवी मुंबईत उपेक्षित राहिला. 


शेवटची घटका मोजत असताना मुंबई महानगरपालिकेने, मुंबईकरांनी त्यांना मदतीचा हात दिला नाही. शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा प्रथम त्यांनी दिला, मात्र शिवसेना-भाजपाने त्यांची उपेक्षाच केली, असे सांगून मुंबई मनपाने त्यांचे मोठे भवन उभारावे, त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा तसेच संत तुकाराम, कान्होपात्रा यांचे साहित्य पूढच्या पिढीला कळावे, यासाठी मनपाने कलादालन उभारावे त्यांच्या नावाने मनपाने नवोदित कवींना भरघोस रकमेचा पुरस्कार द्यावा, अशी मागणी करून त्यांच्या साहित्यातून महाराष्ट्र दाखवला पाहिजे, असेही संसारे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS